Thu, Nov 15, 2018 07:49होमपेज › Aurangabad › प्लॉट खरेदी-विक्री करणार्‍या एजंटचा संशयास्पद मृत्यू

प्लॉट खरेदी-विक्री करणार्‍या एजंटचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्लॉट खरेदी-विक्री करणार्‍या एका एजंटचा बीड बायपास रस्त्यावरील एका हॉटेलशेजारी गुरुवारी सकाळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शेख सुलतान शेख रसूल (वय 48, रा. देवळाई गाव) असे मृत एजंटचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेेख सुलतान हे काही वर्षांपासून जमीन, प्लॉट खरेदी-विक्री करण्याचे एजंट म्हणून काम करत होते. एका व्यवहारानिमित्त ते दोन दिवसांपासून स्वतःच्या दुचाकीवर न जाता मित्रासोबत जात होते. बुधवारी सकाळी देखील ते नेहमीप्रमाणे घरातून मित्राबरोबर बाहेर पडले होते. मात्र रात्री उशीर झाला तरी, ते घरी परतले नव्हते. घरातील लोकांनी त्यांना अनेकदा मोबाइल लावला. मात्र ते प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे घरातील लोकांनी नातेवाईक व त्यांच्या मित्राकडे चौकशी केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. 

गुरुवारी सकाळी देवळाई गावातील एक व्यक्‍ती बीड बायपास रस्त्यावर हॉटेल प्रशांतच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. काहींनी ओळखून ताबडतोब ही माहिती शेख यांच्या नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन शेख यांना घाटीत आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घाटीत शेख यांचे शवविच्छेदन करण्यात आले, मात्र अहवाल राखून ठेवला आहे. त्यांच्या अंगावर कोठेही मारहाण किंवा साध्या खरचटल्याच्याही खुणा नाहीत. मात्र त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शेख यांनी दोन लग्न केलेेले होते. त्यांच्या एका मोठ्या मुलीचा विवाह झालेला आहे. तर इतर मुले लहान आहेत. शेख हे दारू पिण्याच्या सवयीचे होते. त्यामुळे ते हॉटेलमध्ये जास्त दारू पिल्यानंतर बाजूला झोपले असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्‍त केली. मात्र आता शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावरच खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार अर्जुन ढोले तपास करत आहेत.