Mon, May 27, 2019 09:59होमपेज › Aurangabad › जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली

जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 1:17AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्ह्यातील वर्ग-1 च्या अधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन, वर्ग-2 च्या जमीन विक्री प्रकरणात निलंबन कारवाई केलेल्या अधिकार्‍यांची वकिली केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तसेच आता आम्हालाही काम करताना भीती वाटत असल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी डॉ. भापकरांना सांगितले.

कूळ, इनाम, महारहाडोळा, गायरान जमीन विक्री प्रकरणात खात्री न करता, नियमबाह्यपणे विक्री परवानगी दिल्याचे चौकशीत दोषी आढळलेले निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नियमबाह्य जमीन विक्री परवानगी प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजले आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यभरात औरंगाबादेतील महसूल अधिकार्‍यांची प्रतिमा चांगलीच उजळून निघाली आहे. गुरुवारी दुपारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी डॉ. भापकर यांची भेट घेतली. निलंबनाची कारवाई कशी चुकीची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न काही अधिकार्‍यांनी केला. 

याबाबत विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, आज काही अधिकारी भेटायला आले होते. निलंबित केलेल्या अधिकार्‍यांना नोटीस देऊन, त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यायला पाहिजे होती, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र या प्रकरणात केलेल्या चौकशीत ते दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनात हा प्रश्‍न आल्याने, नोटीस देण्यास वेळ नव्हता. तसेच अशा प्रकरणांतून एका बाजूला शासनाची बदनामी होत आहे. त्यामुळे आपले काम नीट कसे होईल, कामात सुधारणा कशा होतील, हे पाहिले पाहिजे. निर्णय घेताना काळजीपूर्वक तपासणी करून, खात्री करूनच निर्णय घेतले पाहिजे. ही सर्व खबरदारी घेतल्यास भीती वाटण्याचे काहीच कारण राहणार नाही, असा सल्लाही त्यांना दिला. 

तिघांना नोटीस; आठवडाभराची मुदत

वर्ग-2 जमीन विक्री परवानगी प्रकरणांत अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी या नोटीस काढण्यात आल्या असून, संबंधित अधिकार्‍यांना त्या बजावण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सांगितल्याची माहिती डॉ. भापकर यांनी दिली. तसेच गावंडे आणि कटके यांचे निलंबन ही तत्काळ कारवाई असून त्यांच्यावर दोषारोप टाकून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येेईल, असेही ते म्हणाले.