Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Aurangabad › कटके-भापकर प्रकरण : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले स्पष्टीकरण

जिल्हाधिकारी म्हणतात... माझे काम न्याय देणे!

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 1:11AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

निलंबित अधिकारी देवेद्र कटके प्रकरणात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी आपली बाजू स्पष्ट केली. माझे काम न्याय देणे आहे, ते काम मी करीत राहील. दोन्ही निलंबित अधिकार्‍यांना पुनर्स्थापित करून घेण्याबाबत मी दिलेला अभिप्राय हा प्रशासकीय आहे. माझा अभिप्राय विभागीय आयुक्‍तांच्या किंवा त्यांच्या चौकशीविरोधात नाही. मी दिलेला अभिप्राय किंवा मताला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. मी कुणाला सपोर्ट करतोय किंवा कुणाला विरोध करतोय, असा त्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे. मी कलेक्टर आहे, मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कूळ, महारहाडोळा, इनामी वतन, गायरान जमिनीच्या नियमबाह्य विक्री परवानग्या दिल्याने चौकशीअंती विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना निलंबित केले आहे. यानंतर दोन्ही अधिकार्‍यांनी त्यावर खुलासावजा पत्र देऊन आम्हाला रुजू करून घेण्याची मागणी विभागीय आयुक्‍तांकडे केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही आपला अभिप्राय विभागीय आयुक्‍तांना सादर केला. यात दोघांनाही पुनर्स्थापित करून घेण्याची शिफारस केली. या शिफारशीमुळे जिल्हाधिकारी निलंबित अधिकार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा संदेश महसूलमध्ये पसरला. त्यातच कटके यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरोधात एक कोटीची लाच मागितल्याची तसेच अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. तसेच कोर्टातही दाद मागितली आहे. या घटनेनंतर महसूल प्रशासन चांगलेच हादरून गेले असून महसूलमधील अधिकार्‍यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. 

विभागीय आयुक्‍त म्हणाले ः 

निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी विभागीय आयुक्‍तांवर लाच मागितल्याची तसेच अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे, याबाबत विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना विचारले असता, ते म्हणाले, या प्रकरणी कोर्टात मॅटर सुरू आहे, त्यामुळे या विषयावर मी काही बोलणार नाही, ते उचित होणार नाही. मात्र निलंबन कारवाई केल्यामुळे त्यातून वाचण्यासाठी त्यांनी असे आरोप केले आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले ः 

निलंबित अधिकार्‍यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी या नात्याने मी माझा अभिप्राय विभागीय आयुक्‍तांना दिला आहे, ही प्रशासकीय बाब आहे, त्यात माझे मत मी व्यक्‍त केले आहे. जिल्हाधिकारी म्हणून ते मी व्यक्‍त करू शकतो. गावंडे आणि कटके या दोघांसाठी हे मत आहे. या दोघांना पुनर्स्थापित करा, अशी शिफारस केली आहे. माझ्याच ऑफिसमध्ये करा, असे त्यात मी म्हटलेले नाही. 

चौकशी समितीने कटके आणि गावंडे यांच्या प्रकरणात ठेवलेले दोष योग्य आहेत की अयोग्य?, याबाबत जिल्हाधिकार्‍यांना विचारले असता, ते म्हणाले, यात खूप प्रशासकीय विषय आहेत, त्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही. माझे मत मी माझ्या फाईलवर नोंदवलेले आहे. माझे मत हे विभागीय आयुक्‍तांविरोधात किंवा त्यांच्या चौकशीविरोधात नाही. आम्ही सर्व अधिकारी आहोत. आम्ही सर्व इंडिपेंडंट व्ह्यूवने काम करतो. मी माझे मत स्वतंत्रपणे लिहू शकतो. त्यावर एखाद्याला माझा सपोर्ट आहे किंवा एखाद्या विरोधात आहे, असा अर्थ काढणे हे अनपेक्षित व चुकीचे आहे. आमचे मत मांडण्याची एक वेगळी सिस्टीम असते, माझे मत एखाद्या व्यक्‍तीविरुद्ध किंवा एखाद्या व्यक्‍तीच्या सपोर्टसाठी नाही. जिल्हाधिकार्‍यांचे काम हे न्याय देण्याचे आहे, पूर्वीपण ते करत होतो, आतापण न्याय देत राहीन.