Mon, Sep 24, 2018 17:30



होमपेज › Aurangabad › दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली

दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 04 2018 1:08AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

दोन वर्षांच्या बालकास फिट येत असल्याचे पाहून त्याच्या आईने मदतीसाठी मारलेली आर्त हाक व आजूबाजूच्या प्रवाशांसह प्रवासी सेना, रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रयत्नामुळे जयपूर-हैदराबाद या अजमेर सुपरफास्ट रेल्वे लासूरस्टेशन येथे थांबा नसतानाही तब्बल पाच मिनिटे थांबली. डॉक्टरांनी त्या चिमुकल्यावर उपचार केल्यानंतरच ती औरंगाबादेत दाखल झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. 
  त्याचे झाले असे की मुकेश शर्मा कुटुंबासह बुधवारी अजमेर एक्स्प्रेसने औरंगाबादकडे येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षांचा रूद्रही होता. रेल्वेने सायंकाळी 5.30 वाजता मनमाड रेल्वेस्टेशन सोडले. ती औरंगाबादकडे येत असतानाच मनमाडपासून काही अंतरावरच रूद्र या दोन वर्षांच्या चिमुकल्याला जोराचा ताप येऊन फिट आली. मुलाची अवस्था पाहून त्याच्या आईने मदतीसाठी आर्त हाक दिली. ही हाक ऐकून रेल्वेतील प्रवासी, तिकीट तपासणीस व प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून लासूर स्टेशन येथे उपचाराची व्यवस्था केली आणि ही रेल्वे लासूर स्टेशन येथे थांबवण्याची परवानगीही मिळवली. सायंकाळी 7.5 वाजता अजमेर एक्स्प्रेस लासूर स्टेशन येथे थांबताच डॉ. तुषार विसपुते यांनी रूद्रवर उपचार केले. उपचार झाल्यानंतर 7.10 वाजता रेल्वे औरंगाबादच्या दिशेने निघाली. उपचारासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शर्मा कुटुंबीयांचे डोळे पाणावले आणि त्यांचे हात आपोआप धन्यवाद म्हणत जोडले गेले. 

तिकीट तपासणीस अशीषकुमार, रेल्वे नियंत्रण कक्षचे प्रमुख मनोज तिवारी, रेल्वे सुरक्षा बलचे अरविंद शर्मा, दिलीप कांबळे, रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी, मनीष मुथा, इस्माईल भारतवाला, स्टेशन मास्टर विजय लहरे यांनी धावपळ केली.