Thu, Jun 27, 2019 14:12होमपेज › Aurangabad › दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 12:55AMआडूळ : प्रतिनिधी

सततच्या नापिकीला कंटाळून एका 40 वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून स्वत:च्याच शेतात आत्महत्या केली आहे. आडूळ शिवारात सोमवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. सूर्यभान हरिभाऊ भावले (वय 40, रा.आडूळ खुर्द, ता.पैठण) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आडूळ शिवारात गावापासून काही अंतरावर भावले यांची गट क्रमांक 32 मध्ये शेती आहे. या शेतात यंदा त्यांनी कपाशीचे पीक घेतले होते, परंतु कपाशी पिकावर पडलेल्या बोंड अळीने पिकाचे मोठे नुकसान केले, तसेच सततच्या नापिकीमुळेही ते निराश होते. या नैराष्यातून सोमवारी मध्यरात्री स्वत:च्या शेतात विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती पोलिस पाटील आप्पाराव भावले यांनी पाचोड पोलिस ठाण्यात दिली. 

सहायक फौजदार कल्याण राठोड, तात्यासाहेब गोपालघरे, रामदास राख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने सदरील शेतकर्‍याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिपान काळे यांनी शवविच्छेदन केले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. भावले यांच्यावर आडूळ खुर्द येथे आज मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.