Sun, Oct 20, 2019 01:34



होमपेज › Aurangabad › कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 12:56AM

बुकमार्क करा





औरंगाबाद ः प्रतिनिधी

बँक आणि सोसायटीचे कर्ज असलेल्या व बोंडअळीमुळे शेतातील कापसाच्या नुकसानीमुळे हताश झालेल्या एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्रीराजा शिवारातील शेतात ही घटना उघडकीस आली आहे. अनिरुद्ध प्रकाश पवार (वय 30, रा. पिंप्रीराजा ता. औरंगाबाद) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध पवार यांनी सेंट्रल बँक व सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे. या पैशातून त्यांनी यंदा शेतात कपाशीची लागवड केली. मात्र काही दिवसांपूर्वी बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ते तणावात होते. कापसाचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेेडावे हा प्रश्‍न त्यांना पडला होता. या तणावातच त्यांनी शनिवारी दुपारी पिंप्रीराजा शिवारातील स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला.

हा प्रकार दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचे चुलत काका नारायण पवार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ताबडतोब ही माहिती करमाड पोलिसांना देऊन नातेवाईकांच्या मदतीने अनिरुद्ध यांना बेशुद्ध अवस्थेत घाटीत आणले. मात्र डॉक्टरांनी पावणेचार वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. अनिरुद्ध यांच्या पश्‍चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचे चुलत काका नारायण पवार यांच्या म्हणण्यानुसार अनिरुद्ध यांनी बँकेचे कर्ज आणि बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाल्याने आत्महत्या केली. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक एस. डी. बागूल हे तपास करत आहेत.