Mon, Aug 19, 2019 01:43होमपेज › Aurangabad › आत्महत्यांचा टक्‍का वाढला

आत्महत्यांचा टक्‍का वाढला

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पाणीटंचाईला तोंड देणार्‍या औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तीन महिन्यांत मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. कर्जमाफीनंतरही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत. जानेवारी ते 8 एप्रिल या 98 दिवसांमध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या 264 पर्यंत गेली आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती हा निर्णय घेते. जानेवारी ते 8 एप्रिल 2018 या कालावधीत झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी 115 शेतकरी कुटुंबे या मदतीस पात्र ठरली आहेत. तर 56 शेतकर्‍यांच्या आत्महत्या इतर कारणांनी झाल्याने त्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरवले गेले आहेत. 

93 प्रकरणे चौकशीस्तरावर प्रलंबित आहेत. जानेवारी महिन्यात 60 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. निकषावर आधारित कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीचा उपाय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्हा यंदा टंचाई आणि शेतकरी आत्महत्या या दोन्ही संकटांना तोंड देत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात टँकरची संख्या पावणे तीनशेच्या घरात गेली आहे. शिवाय राज्यभरात गाजलेल्या औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्‍नावरही अद्याप तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडेच मनपा आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त पदभार असल्याने उपाययोजनांची गती मंदावलेली आहे.2018 मध्ये 8 एप्रिलपर्यंत मराठवाड्यात 264  शेतकरी आत्महत्या झाल्या असून, औरंगाबाद जिल्ह्यात 42, बीड 48, उस्मानाबाद 37, जालना 29, परभणीत 35, हिंगोली 21, नांदेड 26 आणि लातूर जिल्ह्यात 26 शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे.

Tags : Aurangabad, Suicide, rate, increased