Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Aurangabad › आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मागील पाच वर्षांत मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सद्यःस्थिती काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना कोणत्या सरकारी योजनांचा लाभ देता येईल, अशी सर्व माहिती घेण्यासाठी केलेले सर्वेक्षण फोल ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावेळी अधिकार्‍यांच्या पथकासोबत एक-एक एनजीओंचा प्रतिनिधीही राहणार आहे, या सर्वेक्षणाच्या नियोजनाची बैठक येत्या 4 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे. 

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे 4 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकर्‍यांच्या कुटुंबांची आजची अवस्था काय आहे, त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल, या उद्देशाने विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वेक्षण केले होते. नोव्हेंबर महिन्यात महसूलमधील उपायुक्‍त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांनी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला भेट देऊन, त्यांच्याकडून चार पानी फॉर्मही भरून घेण्यात आला होता. त्यानुसार या शेतकर्‍यांना सरकारी योजनांद्वारे मदत करण्याचे निर्देश डॉ. भापकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले होते.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मराठवाडा महसूल प्रबोधिनीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांची कार्यशाळा झाली. 

या कार्यशाळेत आलेल्या महिलांना डॉ. भापकर यांनी या सर्वेक्षणाबाबत विचारणा केली असता, उपस्थित महिलांपैकी चार-सहा महिलांनीच अधिकारी घरी येऊन फॉर्म भरून घेऊन गेल्याचे सांगितले. यामुळे अनेकांच्या घरी अधिकारी प्रत्यक्ष गेलेच नसल्याचे दिसून आले. महसूलमधील सरकारी काम कशारीतीने चालते, याचा अनुभवच डॉ. भापकर यांना यानिमित्ताने मिळाला. अधिकार्‍यांवर विसंबून न राहता, आता एनजीओ प्रतिनिधींना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एनजीओ प्रतिनिधीसह अधिकार्‍यांची टीम या कुटुंबांची भेट घेऊन, फॉर्म भरून घेतील. त्याबाबतचे नियोजन 4 एप्रिल रोजी बैठकीत करण्यात येणार आहे.

 

Tags : Aurangabad, Aurangabad news,  Farmer, Suicidal, Survey Again,


  •