होमपेज › Aurangabad › न्नड येथे ऊस दरवाढसाठी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस 

न्नड येथे ऊस दरवाढसाठी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कन्‍नड : प्रतिनिधी 

तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसाला कपात न करता सरसकट दोन हजार 550 रुपये प्रति टन भाव मिळावा यामागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघातर्फे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून याचा शनिवारी दुसरा दिवस होता. 

 येथील तहसील कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी, भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते व उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, सह निबंधक उमेशचंद्र हुसे,   बारामती अ‍ॅग्रोचे व्यवस्थापक मिलिंद देशमुख यांच्यात झालेल्या बैठकीत  तोडगा न निघाल्याने ऊस उत्पादक संघाचे कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस तोडणी व वाहतूक याचे पैसे कपात न करता जाहीर केलेल्या सरकारी  दराप्रमाणे  देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उपोषणात  शिवसेनेचे डॉ. आण्णासाहेब शिंदे,  भाजपचे उत्तमराव राठोड,  काकासाहेब तायडे, सुनील सोनावणे, देविदास काळे, सुभाष बाविस्कर, विठ्ठल गोलाईत, दिनेश अकोलकर, रामेश्‍वर मोरे आदीं सहभागी झाले आहेत.

आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न

तालुक्यात ऊस दरवाढसाठी लोकशाही मार्गाने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनास काही अज्ञात लोकांकडून हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामती अ‍ॅग्रोसाठी ऊस वाहतूक करणार्‍या काही ट्रकच्या काचा अज्ञाताकडून फोडण्याचा प्रकार घडला आहे. आमचा याच्याशी काहीही संबध नसल्याचे उपोषणाला बसलेल्या आंदोलन कर्त्याचे म्हणणे आहे.

रात्री तोंडाला फडके बांधून काही अज्ञात टोळक्यानी दगड मारत ट्रकच्या काचा फोडल्याचे ट्रक चालकांनी सांगितले. सध्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्यास चाळीसगाव, खुलताबाद आदी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यानी आपला ऊस बाहेरील साखर कारखान्यास अधिक प्रमाणात दिला आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखाना सुरू झाल्याने बाहेरील कारखान्यांनी येथून मोठ्या प्रमाणात ऊस नेण्यास सुरुवात केली, बारामती अग्रो सुरू होण्याआधी काही शेतकर्‍यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस दिला होता, त्याचे पैसे मिळविताना एकेक कारखान्यांकडून  शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत असताना आंदोलनाच्या त्रासातून कारखाना पुन्हा बंद पाडण्याचा डाव तर नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.