Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Aurangabad › अनुदान परस्पर कर्ज खात्यावर

अनुदान परस्पर कर्ज खात्यावर

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:06AMवाळूज : प्रतिनिधी

वाळूजलगतच्या शेंदुरवादानजीक असलेल्या नागापूर येथील  एका शेतकर्‍याला मंजूर झालेले शासकीय फळबाग योजनेचे अनुदान चक्‍क कर्ज खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे लाभार्थी हतबल झाले असून संकटात सापडलेल्या अशाच एका शेतकर्‍याने जीवनयात्रा संपविण्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे.

अधिक माहिती अशी, दत्तात्रय शेषराव दुबिले यांची नागापूर शिवारात गट क्र. 73 मध्ये  8 आर जमीन असून यात त्यांनी मोसंबीचे पीक घेतले त्याचे अनुदान बँक खात्यात जमा झाले होते.परंतु बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे अनुदान स्वरूपात आलेली रक्‍कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग करण्यात आली. त्रस्त शेतकर्‍याने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना गुरुवारी (दि.24) निवेदन देत  योग्य तो न्याय मिळाला नाही तर जीवन यात्रा संपविण्याचा इशारा दिला आहे.

सध्याची गंगापूर तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. बोंडअळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून शेती करणे कठीण होत चालले आहे. केलेला खर्चसुद्धा निघत नाही. पीक विमा, अनुदान, कुठलीही शासकीय मदत कर्ज खात्यात वर्ग करू नये असा शासनाचा आदेश असूनही बँकेने मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे..

दुष्काळी परिस्थितीत पिके जगवणे कठीण झाले असून बँकेच्या तुघलकी धोरणामुळे माझ्यावर उपसमारीचे वेळ आली आहे, माझी मानसिक व शारीरिक स्थिती खालावली आहे. -दत्तात्रय दुबिले, पीडित शेतकरी

सदरील अनुदान रक्‍कम ऑनलाइन पीक खात्यात जमा झाली आहे. -के.एस.कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक म. ग्रा.बँक शेंदुरवादा. 

या प्रकरणाची चौकशी करून योग्य न्याय देण्यात येईल. -चंद्रकांत शेळके, तहसीलदार गंगापूर