होमपेज › Aurangabad › माचेवाडला पोलिस कोठडी; साखरेची हर्सूलला रवानगी

माचेवाडला पोलिस कोठडी; साखरेची हर्सूलला रवानगी

Published On: Dec 30 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 1:27AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या लाचखोर उपविभागीय अधिकारी आणि दहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या लघुलेखकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्या. डी. एस.  शिंदे यांच्यासमोर हजर केले असता, उपविभागीय अधिकारी अनिल गोविंद माचेवाड याला 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली,  तर लघुलेखक रत्नाकर महादू साखरे याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.   

सिल्लोडमधील तक्रारदार वकील यांच्या आजोबाच्या नावे मौजे चांदापूर येथील गट क्र. 58, सर्व्हे क्र. 45 मध्ये 29 एकर 21 गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. आरोपींनी कूळ कायद्याअंतर्गत कोणतीही परवानगी न घेता शेरखान अकबर खान, अताऊर रहेमान वजीर खान, हारुण बुढन चौधरी व अब्दुल सलाम अब्दुल अहाद यांच्या नावे खोटे खरेदीखत नोंदविण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांचे वडील व काका यांनी चौघांविरुद्ध दिवाणी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला.

दरम्यान, तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून केलेल्या अर्जात माचेवाड यांनी स्थगिती देण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजारांची मागणी केली. प्रकरणात आरोपीविरुद्ध पडताळणी करून रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी आरोपींच्या बँक खात्याची चौकशी करणे आहे, मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली.  सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.