Sun, Jul 21, 2019 17:06
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › कॉपी करताना पकडताच, विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न (Video)

कॉपी करताना पकडल्याने आत्महत्येचा प्रयत्न (Video)

Published On: Apr 10 2018 8:04PM | Last Updated: Apr 11 2018 9:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कॉपी करताना पकडून पालकांना कळवत रस्टिकेट करण्याची धमकी शिक्षकांनी दिल्याने नर्सिंगच्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बीड बायपासवरील एमआयटी महाविद्यालयात घडली. सचिन सुरेश वाघ (वय 20, रा. नवनाथनगर, हडको) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाघ हा परीक्षा देण्यासाठी सकाळी महाविद्यालयात गेला होता.

न्युट्रिशन बायोकेमिस्ट्रीचा पेपर सुरू झाला. सचिन हा कॉपी करत असल्याचे पर्यवेक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी सचिनाला पकडले आणि प्राचार्यांसमोर उभे केले. तेथे सचिनने चूक झाली असे म्हणत माफी मागितली. मात्र, प्राचार्यांनी त्याच्यावर कारवाई करत रस्टिकेट करणार असल्याचे सांगितले. तसेच आता तू घरी जा आणि पुढील पेपरला ये असे सांगितले. त्यामुळे सचिन हा प्रचंड घाबरून गेला. त्याने मित्र सौरभ रणदिवे यास फोन केला. त्याने तो उचलला नाही. दुसर्‍या मित्राला फोन करत मला कॉपी करताना पकडले आहे. मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. एमजीएमच्या मित्राने रणदिवे यास ही माहिती सांगितली. सचिनने खिडकीची काच सरकवून चौथ्या मजल्यावरून उडी मारली. सचिन प्रवेशद्वारावर असलेल्या स्लॅबवर पडून गंभीर जखमी झाला. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्‍चर झाले. 
 

Tags : Aurangabad, Aurangabad news, exam, cheating, Student, suicide attempt,