होमपेज › Aurangabad › सेनेच्या ‘स्ट्राँग हाऊस’वर आघात करा!

सेनेच्या ‘स्ट्राँग हाऊस’वर आघात करा!

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 21 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

केंद्रात व राज्यात पक्षाला वातावरण चांगले आहे. नगरची महापालिकाही ताब्यात घेण्याची व स्वतःला सिध्द करण्याची संधी चालून आली आहे. त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, खा.दिलीप गांधी, अभय आगरकर यांनी एकत्र बसून रणनिती ठरवावी. शिवसेनेच्या नगरसेवकांबाबत जनतेच्या मनात विश्‍वास आहे. तसाच तो तुम्हाला निर्माण करावा लागेल. तसे उमेदवार तुम्हाला द्यावे लागतील. शिवसेनेचे स्ट्राँग हाऊस शोधा, त्यावर आघात करता आला पाहिजे, असा कानमंत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरच्या पदाधिकार्‍यांना दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुका स्वबळावरच लढण्याच्या दृष्टीने भाजपने वाट धरली असून शिवसेनेलाच लक्ष्य करण्याचा सूर बैठकीत निघाला आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात होणार्‍या मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातील अंतर्गत गटबाजी, निवडणुकीची रणणिती, सध्याची राजकीय परिस्थिती यावर मंगळवारी (दि.21) मुंबई बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खा.दिलीप गांधी, आ.सुरजितसिंह ठाकूर, अभय आगरकर, विजय पुराणिक, किशोर काळकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकीला सामोरे जातांना नेत्यांचे पक्षांतर्गत संघर्ष मिटवावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. तसेच पक्षाच्या पुढाकारातून शहरात होत असलेली विकासकामे व या माध्यमातून पक्षासाठी असलेले चांगले वातावरण यावरही चर्चा झाली. उपनगर भागातील पक्षाचे प्राबल्य नसलेल्या प्रभागात लक्ष केंद्रीत करावे. उमेदवार आयात करतांनाच भविष्यात भाजपाची नवीन पिढी उभी रहावी, ती दीर्घकाळ टिकावी, याचीही दक्षता घ्यावी. त्यासाठी कोरी पाटी असलेल्या चेहर्‍यांना प्राधान्य द्यावे. पक्षाने शासनस्तरावर शहरातील विकासाबाबतचे प्रलंबित विषय मार्गी लावावेत, त्याचा पक्षाला निवडणुकीत फायदा होईल, अशी मते यावेळी मांडण्यात आली.

त्यानंतर पालकमंत्री शिंदे, किशोर काळकर, विजय पुराणिक यांनी पदाधिकारी नगरसेवकांना मार्गदर्शन करतांनाच कानपिचक्याही दिल्या. सांगली, जळगाव मध्ये केवळ संघटना मजबूत असल्यामुळे, कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केल्यामुळे निवडणुका जिंकता आल्या.  सर्वत्र चांगले वातावरण असल्याने त्याचा फायदा होईल. नगरची महापालिका ताब्यात घेता येईल. पक्षासाठी ही संधी चालून आली आहे. स्वतःला सिध्द करुन दाखविण्याची ही वेळ आहे. सर्वांनी एकत्र काम केले तर हे ध्येय निश्‍चित गाठता येईल, असा विश्‍वास वरिष्ठांनी व्यक्‍त केला.

स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी रणनिती आखावी लागेल. पालकमंत्री, खासदार व आगरकर यांनी एकत्र बसून याबाबत चर्चा करावी. अंतर्गत वाद मिटवावेत. शिवसेना नगरसेवकांबाबत तेथील नागरिकांच्या मनात आपला माणूस असल्याचा विश्‍वास आहे. आपल्यासाठीही तसा विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. तसे उमेदवार प्रोजेक्ट करावेत. शिवसेना ज्या मुद्द्यांवर मतदारांना आपल्याकडे वळविते, त्याचा अभ्यास करुन तशी रणनिती आखा. शिवसेनेचे स्ट्राँग हाऊस (प्राबल्य असलेले प्रभाग) कोणते, हे शोधा. त्याच्यावर आघात करता आला पाहिजे, असा कानमंत्र देत आगाणी निवडणुकीत शिवसेनेलाच लक्ष्य करण्याच्या सूचना नगरच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या. केवळ धनशक्‍तीच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. संघटन मजबूतच असावे लागेल. भाजपची सत्ता आणणे, एवढेच ध्येय ठेवा, अशा कानपिचक्याही वरिष्ठांनी दिल्याचे समजते.

निवडणुका होईपर्यंत का होईना एकत्र या!

शहर भाजपातील अंतर्गत मतभेद, वाद बाजूला ठेवा. या वादामुळेच नगर ऐवजी मुंबईला बैठक घ्यावी लागली. निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र यावेच लागेल. निदान निवडणुका होईपर्यंत का होईना पण एकत्र या! अशा शब्दांत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी खा.दिलीप गांधी व अभय आगरकर यांना तंबी दिली.दरम्यान, बैठकीतील माहिती बाहेर जावू देवू नका, अशा सूचनाही यावेळी नगरसेवक, पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या.

‘तसेच’च्या ठरावांवरही बैठकीत चर्चा!

महासभेत, स्थायी समितीत करण्यात आलेल्या ‘तसेच’च्या ठरावांबाबत तात्काळ निर्णय घेवून शासनाने ते रद्द करावेत, अशी मागणी भाजप नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली. यातील काही ठरावांची अंमलबजावणीही झाली असल्याकडे काहींनी लक्ष वेधले. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होणे कितपत योग्य आहे, याचाही विचार करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

एकत्र येऊन निवडणुकीची रणनिती ठरविणार!

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र सर्व्हे करण्यात येईल. तेथील परिस्थिती, सक्षम उमेदवार याबाबत माहिती घेतली जाईल. उमेदवारांना तिकीट वाटपासह सर्व निर्णय या सर्व्हेनुसाच घेतले जातील. कोणा एकाचा या प्रक्रियेवर प्रभाव राहणार नाही, असे भाजपच्या नेत्यांकडून बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तीन-चार जण एकत्र येवून रणनिती ठरवतील. प्रत्येकाने मत जरुर मांडावे. मात्र, जो निर्णय होईल, तो मान्य करावा, असेही यावेळी बजावण्यात आले.