Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › वादळी पावसाचा तडाखा

वादळी पावसाचा तडाखा

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सोमवारी पुन्हा एकदा वादळी पावसाने औरंगाबादला तडाखा दिला. अचानक वादळी वार्‍यासह शहरातील काही भागांत जोरदार पाऊस पडला. या वादळी वार्‍याचा सर्वाधिक फटका सातारा-देवळाई, नक्षत्रवाडी परिसराला बसला. या परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले, भिंती कोसळल्या, होर्डिंग्ज पडले, झाडे उन्मळून पडली. गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. अधूनमधून ढग दाटून येत आहेत. वादळी वारे सुटत आहे. रविवारीही रात्री शहरासह परिसरात असाच वादळी पाऊस झाला. सोमवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. उकाड्याने सर्वांना घामाघूम करून टाकले होते. अचानक चार वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचा जोर नव्हता; परंतु सातारा, देवळाई, नक्षत्रवाडी परिसरात मात्र पाऊण तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. 

अनेक घरांवरील पत्रे उडाले

वादळी वार्‍याचा खरा फटका बसला तो कांचनवाडी, नक्षत्रवाडी, ईटखेडा, सातारा परिसराला. या परिसरात असलेल्या अनेक घरांवरील लोखंडी पत्रे उडून गेले आहेत. कांचनवाडीतील किशोर रूपचंद सावंत, इमरान शेख, मुजीब शेख, असरार शेख, रामेश्‍वर ठाकरे, शया कृष्णा मोडीकर यांच्या दुकांनावरील पत्रे उडून गेली, तर सातारा परिसरातही कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या मागील भागातील अनेक नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडाली. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. ईटखेड्यात तीन व देवगिरी महाविद्यालयाच्या समोरचे एक झाड वार्‍याच्या वेगाने उखडून पडले. या ठिकाणी तत्काळ अग्‍निशमनच्या कर्मचार्‍यांना मदतीसाठी पाचारण झाले होते.  सातारा परिसरालाही वादळाचा भयंकर फटका बसला. सोसाट्याच्या वार्‍याने बीडबायपास लगत असलेले विविध बॅनरही जमीनदोस्त झाले आहेत.

बजाज हॉस्पिटलते रामकृष्ण मिशन आश्रमाच्या रोडलगत असलेले मोठमोठे बॅनर उखडून पडले, तर आसपास असलेल्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपला व्यवसाय सोडून टपरीचालक, हॉटेलवाले जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागी जाण्यासाठी धावाधाव करीत होते, तर दुचाकी घेऊन जाणार्‍या एका महिलेचा वार्‍याने उडत आलेल्या बॅनरच्या फटक्यापासून जीव वाचला, असे प्रथमदर्शी नागरिकाने कळविले. तसेच मूळ सातारा गावातील कृष्णा सोनवणे यांच्या घरावर मुळासकट झाड उखडून पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजी दसपुते, सुदाम नरोडे यांच्या घरावरील पत्रे उडाले तर भिंती कोसळून पडल्यामुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यही घरातच उपस्थित होती; परंतु सुदैवाने कोणालाही हानी पोहचली नाही.

Tags : Aurangabad, Stormy, rain