होमपेज › Aurangabad › रॅडिको बंद करा, संचालक मंडळावर गुन्हे नोंदवा

रॅडिको बंद करा, संचालक मंडळावर गुन्हे नोंदवा

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:33AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी 

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको कंपनीतून नदीमध्ये सोडण्यात येत असलेल्या घातक रसायनांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार सूचना आणि कायदेशीर नोटीसना मुजोर कंपनी अधिकारी जुमानायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि जीवितास धोका पोहोचवणारी रॅडिको कंपनी बंद करण्यात यावी. तसेच कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हे नोंदवावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत मंजूर करण्यात आला आहे.

जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (दि. 12) स्थायी सभा पार पडली. सभेच्या प्रारंभीच मागील सभेच्या अनुपालावरून प्रचंड गदारोळ झाला. शहराच्या पूर्वेकडील मुख्य नदी असलेल्या सुखना नदीमध्ये सर्रासपणे विषारी रसायने सोडली जात आहेत. एमआयडीसीतील रॅडिको या कंपनीद्वारे ही रसायने सोडली जात असून गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरी, नागरिक या विरोधात लढा देत आहेत. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे सबंध कंपनीवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. काही महिन्यांपूर्वीच कंपनीच्या प्रदूषणामुळे दोन व्यक्‍तींना आपला जीव गमवावा लागला होता.

प्रदूषण मंडळही त्यावर कोणतीच कारवाई करत नाही. कंपनीची चौकशी करून कंपनी बंद करण्याचा ठराव सदस्य रमेश गायकवाड यांनी मांडला.  भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी ठरावास विरोध केला. मात्र, त्यास काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी अनुमोदन देत बहुमताने तो पारित केला. हा ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे. सदस्य किशोर बलांडे आणि अविनाश गलांडे यांनीही कंपनीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. कंपनी बंद करून नागरिकांच्या जीविताशी खेळणार्‍या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी सदस्यांनी केली. कंपनीविरोधात कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही सदस्यांनी दिला. सभेस उपाध्यक्ष केशवराव तायडे यांचीही उपस्थिती होती.

प्रदूषणाचे 149 रुग्ण

रॅडिको कंपनीतून निघणार्‍या विषारी रसायनामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडत आहेत. जि.प. आरोग्य विभागाने परिसरातील गावांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये त्वचारोगाचे 42 रुग्ण, दातांच्या समस्या असलेले 20, हाडांच्या समस्या असलेले 35, किडनी विकाराचे 30, तर अर्धांगवायूचे 16 असे एकूण 149 रुग्ण आढळल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.