Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Aurangabad › स्थायी समिती सभापती निवडणुक : बारवाल देणार सेनेला धक्‍का?

स्थायी समिती सभापती निवडणुक : बारवाल देणार सेनेला धक्‍का?

Published On: Jun 01 2018 1:56AM | Last Updated: Jun 01 2018 12:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर पुन्हा एकदा नगरसेवक राजू वैद्य यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मावळते सभापती गजानन बारवाल यांनीदेखील सेनेकडून संधी न मिळाल्याने दुसर्‍यांदा सभापती पद मिळविण्यासाठी जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे. विरोधी पक्ष एमआयएम, काँग्रेस, तसेच युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप सदस्यांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदतीच्या भरवशावर त्यांनी ही मोर्चेबांधणी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. भाजपाने दगाफटका केला तर बारवाल सेनेला धक्का देत पुन्हा एकदा सभापती बनू शकतात, हे विशेष.  

स्थायी समिती सभापती पदासाठी शनिवारी निवडणूक होत आहे. युतीतील करारानुसार यावेळी सभापती पद शिवसेनेकडे असणार आहे. त्यामुळे सेनेत या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू होती. नगरसेवक राजू वैद्य, खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे आणि आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट हे तिघेही या पदासाठी इच्छुक होते. मात्र सेनेने आमदार-खासदारपुत्रांऐवजी ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांना उमेदवारी दिली आहे. सद्यःस्थितीत स्थायी समितीत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत आहे. मात्र, मावळते सभापती बारवाल यांनीही दुसर्‍यांदा सभापती पद मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. एमआयएमचे चार, काँग्रेसचा एक आणि सेना-भाजपच्या कोट्यातून स्थायीत सदस्यत्व मिळविलेल्या काही अपक्षांच्या मदतीने हे पद मिळविता येईल, यादृष्टीने त्यांनी प्रयत्न चालविल्याची माहिती आहे. 

शिवसेनेतर्फे बारवालांची मनधरणी

दरम्यान, वैद्य यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेकडून बारवाल यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गुरुवारी दुपारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, बारवाल, वैद्य यांच्यात बैठक झाली. त्यात बारवाल यांनी उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून त्यांना गळ घातल्याचे समजते. मात्र, बारवाल यांनी भाजप पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्ट केल्याचेही सूत्रांकडून समजते. 

तीन जणांनी नेले आठ अर्ज

स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी शिवसेनेने चार, एमआयएमने दोन आणि शहर विकास आघाडीने दोन असे एकूण आठ अर्ज घेतले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शिवसेनेतर्फे दुपारी सभागृहनेते विकास जैन यांनी, शहर विकास आघाडीतर्फे गटनेते गजानन बारवाल आणि एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी हे अर्ज घेतले.