Wed, Apr 24, 2019 16:30होमपेज › Aurangabad › ‘हवाहवाई’च्या औरंगाबादेतही आठवणी

‘हवाहवाई’च्या औरंगाबादेतही आठवणी

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 1:10AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये चार चाँंद लावणारी सिनेअभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. 1997 साली सामाजिक काम करणार्‍या महिलांची राज्यस्तरीय परिषद ही रामा इंटरनॅशनल येथे झाली होती. या कार्यक्रमास श्रीदेवी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी पुरुषप्रधान संस्कृती असली तरीही तुम्ही कणखर राहा, असे सांगत महिलांना सक्षम होण्याचा संदेश दिला. त्याप्रसंगी अशोक उजळंबकर यांनी श्रीदेवी यांची मुलाखतही घेतली होती. 


...असाही दुर्देवी योगायोग

‘लाडला’ या चित्रपटाचे काही शुटिंग औरंगाबाद येथे झाले होते. सुरुवातीला दिव्या भारती ही चित्रपटाची नायिका होती. मात्र औरंगाबादवरून शुटिंग संपून मुंबईत परतल्यावर दुसर्‍या दिवशीच दिव्या भारतीचा मृत्यू झाला. त्यामुळे ‘लाडला’ या चित्रपटातील मुख्य नायिकेची भूमिका श्रीदेवी यांना मिळाली. हा चित्रपटही सुपरहिट ठरला. रविवारी दिव्या भारतीचा जन्मदिवस आणि त्याच दिवशी श्रीदेवी यांचे निधन झाले. हा दुर्दैवी योगायोग असल्याच्या भावना अशोक उजळंबकर यांनी व्यक्‍त केल्या.

अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व

श्रीदेवी एक चतुरस्त्र अभिनेत्री तर होतीच; पण तिने ज्या विविध भूमिका केल्या त्यातून तिने एक अष्टपैलू भूमिकांचे कंगोरे सर्वांसमोर आणले. ती कितीही मोठी कलाकार झाली तरी तिने नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांच्याकडूनही शिकत व त्यांनाही शिकवत हा मोठा गुण तिच्यात दिसून येतो असे नाट्यशास्त्र विभागप्रमुख जयंत शेवतेकर यांनी सांगितले.

स्वच्छ अंतःकरण असणारी ती अभिनेत्री 

एका दाक्षिणात्य अभिनेत्री असूनही बॉलिवूडला एक नवे स्त्री सौंदर्य देण्याचे काम श्रीदेवी यांनी केले. अष्टपैलू अशी अभिनेत्री तसेच कलात्मक सिनेमावर त्यांचे प्रेम होते. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे त्यांनी भारतीय समाजाला इंग्रजीचे महत्त्व पटवून दिले. नवोदित कलाकारांसोबत काम करणारी अशी  निगर्वी व स्वच्छ अंतःकरण असणारी ती अभिनेत्री होती, असे चित्रपट दिग्दर्शक अनिलकुमार साळवे म्हणाले.

तिचं जाणं चटका लावणार

20 ते 25 वर्षे सिनेमा जगतावर राज्य केलेली जी माणसे आहे त्यात श्रीदेवीचा नंबर खूप वरचा आहे. अभिनय व ग्लॅमर यांचे अजब रसायन असलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी होय. तिची शरीरभाषा नटखट असल्याने तिचा अभिनय खूप लोकांना भावला. कमर्शिअलदृष्ट्याही ती एक यशस्वी अभिनेत्री ठरली. चरित्र अभिनेत्री म्हणूनही ती ‘इंग्लिश विंग्लिश’ तसेच ‘मॉम’ चित्रपटातही चांगली उभी राहिली होती. तिचं जाणे हे चटका लावणारे आहे, असे अभिनेता, दिग्दर्शक  डॉ. दिलिप घारे यांनी सांगितले.