Wed, Nov 14, 2018 14:37होमपेज › Aurangabad › पावसाचा उकाड्यावर शिडकावा

पावसाचा उकाड्यावर शिडकावा

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या काही दिवसांत पारा चाळिशीपर्यंत गेला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सायंकाळी साडेचार वाजेनंतर शहरातील विविध भागात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर उकाड्याने त्रस्त आबालवृद्धांनी पावसाच्या धारा अंगावर घेत मनसोक्‍त भिजण्याचा आनंद लुटला. पावसामुळे गारखेडा भागातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले, तर शहरात दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा तीन दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाची चिन्हे दिसून आली. काही भागात पडलेल्या हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी शहरात सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी सुटलेल्या वादळवार्‍याने शहरवासीयांची दाणादाण उडवली होती. वार्‍यामुळे ढग वाहून गेल्याने पाऊस काही जास्त पडला नाही. मंगळवारीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विजांच्या कडकडाटासह सरींनी आगमन केले, पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर पडताच मातीचा सुगंध दरवळला. काही वेळाने पावसाचा जोर वाढला, अन् पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. रस्त्याच्या कडेला तसेच नागरी वसाहतींच्या सखल भागात पाणी साचून तलाव तयार झाले. 

Tags : Aurangabad, Sprinkle, rain,  summer, season