होमपेज › Aurangabad › प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे  ८२ लाखांचे अनुदान मंजूर 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे  ८२ लाखांचे अनुदान मंजूर 

Published On: Dec 27 2017 1:39AM | Last Updated: Dec 27 2017 1:39AM

बुकमार्क करा
 सोयगाव ः प्रतिनिधी

 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 2017-18 या वर्षातील 82 लाख 86 हजार रुपयांचे अनुदान सोयगाव तालुक्यासाठी प्राप्त झाले आहे. 1 हजार 329 पैकी 169 शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात अनुदानास पात्र ठरविण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले यांनी मंगळवारी दिली. .ठिबक सिंचनसाठी अग्रेसर असलेल्या या तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 329 शेतकर्‍यांचे प्रस्ताव तालुका कृषी विभागाला प्राप्त झाले होते. सन 2017-18 या वर्षात दोनशे दहा हेक्टरसाठी 82 लाख 86 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून 1 हजार 329 शेतकर्‍यांपैकी 169 शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात ठिबकच्या अनुदानास पात्र करण्यात आले आहे.

त्यापैकी 521 शेतकर्‍यांना पूर्वसंमती देण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी घुले यांनी सांगितले. दरम्यान, कर्जमाफी आणि बोंड अळींच्या मदतीच्या आधीच ठिबक सिंचनचे अनुदान शेतकर्‍यांच्या पदरात पडल्याने ऐन संकटात शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तालुका कृषी विभागाकडून सुरू झालेली आहे. संबंधित बँकांचा कासवगतीने सुरू असलेला कारभार शेतकर्‍यांना घातक ठरत असल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले.