Thu, Jul 09, 2020 09:23होमपेज › Aurangabad › सोनियांच्या नावाने कर्ज माफीची अफवा; उसळली गर्दी

सोनियांच्या नावाने कर्ज माफीची अफवा; उसळली गर्दी

Published On: Dec 04 2017 2:30PM | Last Updated: Dec 04 2017 3:41PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सोनिया गांधी बचतगटाच्या माध्यमातून एक लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात येत आहे, अशी अफवा पसरताच कर्जाचे अर्ज जमा करण्यासाठी सिडको पोलिस ठाण्याजवळ असणार्‍या रमाई विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी कष्टकरी, कामगार महिलांची तुडुंब गर्दी उसळली. ही गर्दी आवरता-आवरता पोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. गर्दीमुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. काँग्रेसने मात्र ही शुद्ध फसवणूक असून, सोनिया गांधी यांच्या नावाने कर्जवाटप करण्याची पक्षाची कसलीही योजना नाही. सोनियांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी बचतगट जिल्हा महासंघाच्या वतीने बचतगटांना सभासद होण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शंभर टक्के मोफत सुविधा दिली जात असून, या योजनेसाठी मोफत अर्जांचे वाटप केले जाणार होते. मात्र या ठिकाणी एक लाख रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून दिले जात असल्याची अफवा परसली. कर्ज मिळेल, या अपेक्षेने आलेल्या हजारो कष्टकरी महिलांनी रमाई हायस्कूल परिसरात एकच गर्दी केली होती. जिल्हाभरातून तब्बल 15 हजार महिला येथे जमल्या होत्या. अर्ज स्वीकारण्यासाठी या महिलांकडून प्रत्येकी शंभर रुपये आकारले जात होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

...म्हणे कर्ज माफ होणार

अचानक गर्दी उसळल्याने कार्यकर्ते कुठलीही नोंद न घेता फाईल एकत्र करण्याचे काम करत होते. ‘आम्हाला सोनिया गांधी यांच्याकडून कर्ज मिळणार असून, काँग्रेस सरकार आल्यानंतर ते माफ केले जाणार आहे,’ असे काही महिलांनी सांगितले

पदाधिकारी ‘नॉट रिचेबल’ 

सोनिया गांधी बचत गट जिल्हा महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल ‘नॉट रिचेबल’ सांगत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याच संघटनेतील नंदू गोटे यांच्याशी संपर्क साधला असता, काळेबेरे असल्याचा संशय आल्याने यापूर्वीच आपण ही संघटना सोडल्याचे त्यांनी सांगितले.
 

झेरॉक्सचा धंदा जोरात

झेरॉक्ससाठी व कागदपत्रे ठेवण्यासाठी लागणारी फाईल घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केल्याने रविवारी धंदा जोरात झाला


पोलिसांत तक्रार करणार

‘काँग्रेस पक्षाकडून महिला बचत गटांसाठी अशी कुठलीही योजना नाही. सोनिया गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचा वापर करून बचत
गट महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही लवकरच याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार आहोत’ असे काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले.