Thu, Jul 18, 2019 06:06होमपेज › Aurangabad › ‘स्मार्ट सिटी’ला खो, निधीवर वक्रदृष्टी!

‘स्मार्ट सिटी’ला खो, निधीवर वक्रदृष्टी!

Published On: Aug 27 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 1:20AMऔरंगाबाद ः सुनील कच्छवे

स्मार्ट सिटीच्या आराखड्यात चिकलठाणा येथील नियोजित अत्याधुनिक सिटीसाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे, मात्र आता हा निधी शहरातील कामांसाठी वळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी केंद्राकडे रीतसर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

स्मार्ट सिटी अभियानात 2016 साली औरंगाबाद शहराची निवड झाली. त्याच वेळी स्मार्ट सिटीचा 1730 कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा सादर केलेला आहे. त्यानुसार 365 कोटी रुपये हे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या कामांवर खर्च होणार आहेत, तर 1198 कोटी रुपयांतून चिकलठाणा येथे तीनशे एकर जागेत अत्याधुनिक शहर उभारण्यावर खर्च करण्याची तरतूद आहे. उर्वरित दोनशे कोटींचा निधी हा देखभाल, दुरुस्ती आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या आस्थापना खर्चासाठी राखीव आहेत. हा आराखडा शहरवासीयांच्या सूचना घेऊनच तयार करण्यात आला होता. त्यात शहरवासीयांनी ग्रीनफिल्ड(खुल्या जागेत शहर वसविणे) प्रकार निवडला होता. त्यानुसार चिकलठाणा येथे हे शहर वसविण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे, मात्र आता स्मार्ट सिटीतील निधीचा वापर सध्याच्या शहरवासीयांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी करावा, असा सूर उमटत आहे. अशीच मागणी देशभरातील इतर स्मार्ट सिटीतूनही होत होती. त्यामुळे केंद्र सरकारने ग्रीनफिल्डचा निधी वळविण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याची मुभा दिली आहे. हे प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत ही 10 सप्टेंबर आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या वतीनेही ग्रीनफिल्डचा बाराशे कोटींचा निधी शहरातील कामांसाठी वळविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पर्यटन, सफारी पार्क, नवीन भागातील पाणीपुरवठा योजना अशा कामांसाठी हा निधी वापरण्याचा स्मार्ट सिटीच्या काही संचालकांचा विचार आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन प्रा. लि. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे प्रस्ताव तयार करून तो चेअरमन पोरवाल यांच्यामार्फत केंद्राकडे सादर करणार असल्याचे समजते. 

असीम गुप्तांकडे धुरा सोपविण्यासाठी गळ

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या चेअरमन पदाची धुरा सध्या अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्याकडे आहे. उद्योग विभागात असताना त्यांनी औरंगाबाद डीएमआयसीबरोबरच स्मार्ट सिटीच्या कामातही लक्ष घातले होते, मात्र आता उद्योग विभागातून दुसर्‍या विभागात बदली झाल्यापासून त्यांनी औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम स्मार्ट सिटीच्या कामावर होतो आहे. म्हणून आता चेअरमनपदाची धुरा असीम गुप्ता यांच्याकडे सोपविण्यासाठी पालिकेतील पदाधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांना गळ घालण्यात आली आहे. गुप्ता हे याआधी 2006 ते 2008 या काळात मनपा आयुक्त राहिलेले आहे. सध्या ते सचिव असून त्यांच्याकडे सोलापूर स्मार्ट सिटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. गुप्ता आणि पालिकेतील लोकप्रतिनिधींचे संबंध मधूर राहिलेले आहे. त्यामुळेच आता त्यांना आणण्यासाठी पालिकेतील पदाधिकार्‍यांचे प्रयत्न आहेत.