Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Aurangabad › स्मार्ट सिटीचा निधी खासगी बँकेतच

स्मार्ट सिटीचा निधी खासगी बँकेतच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा निधी खासगी बँकेत ठेवण्याबाबत विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीचे तत्कालीन चेअरमन अपूर्व चंद्रा यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतरही मनपा अधिकार्‍यांनी हा निधी राष्ट्रीयीकृत बँकेत जमा केलेला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत स्मार्ट सिटीचा 281 कोटी रुपयांचा निधी खासगी बँकेतच जमा आहे. 

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेत दोन टप्प्यांत देशातील 47 शहरांची निवड केलेली आहे. यामध्ये ऐतिहासिक औरंगाबाद शहराचाही समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत शहराला पुढील पाच वषार्र्ंत एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी 18 जून 2016 रोजी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनीच्या स्थापनेनंतर दहा महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात शासनाने औरंगाबाद शहराला 137 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

स्मार्ट सिटीचे नोडल ऑफिसर तथा मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी त्यावेळी हा निधी राष्ट्रीयीकृत बँकेत न ठेवता तो एस बँक या खासगी बँकेत ठेवला. जून महिन्यात पार पडलेल्या एसपीव्हीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन अपूर्व चंद्रा यांनी खासगी बँकेत निधी ठेवण्यावर आक्षेप नोंदवित हा निधी राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावा, अशी सूचना केली होती.

त्यानंतर काही दिवसांत शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत शहरासाठी आणखी 144 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; परंतु मनपातील अधिकार्‍यांनी तो निधीही पुन्हा एस बँकेतच जमा केला. सद्यःस्थितीत एस बँकेत स्मार्ट सिटीचा 281 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच शासनाने अपूर्व चंद्रा यांच्याऐवजी एसपीव्हीच्या चेअरमनपदी उद्योग व ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची नियुक्‍ती केली आहे.