Sun, Mar 24, 2019 17:21होमपेज › Aurangabad › काही सेकंदात मोकाट कुत्रे जाळ्यात

काही सेकंदात मोकाट कुत्रे जाळ्यात

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:22AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना ‘ते’ अवघ्या काही सेकंदामध्ये पकडतात. दोरीचा फास बनवून भटके कुत्रे पकडण्याची जुनी पद्धत सोडून त्यांनी जाळीचा वापर सुरू केला आहे. या कामाचे पुणे येथील रेस्क्यू कंपनीकडे रीतसर प्रशिक्षणही घेतले. आता अवघ्या काही सेकंदात ते भटके कुत्रे जाळ्यात पकडतात. शिवाय या नवीन पद्धतीमध्ये चावा घेण्याचा धोका कमी असल्याने कुत्रे पकडण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम मनपाने पुणे येथील ब्ल्यू क्रॉस या संस्थेला दिले आहे. आसाम राज्यातील पाच तरुण मागील महिनाभरापासून शहरातील भटकी कुत्री पकडण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास दोनशे कुत्री पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांनी पोटासाठी कुत्रे पकडण्याचे काम निवडले आहे. औरंगाबादला आलेेले तरुण जवळपास पाच ते आठ वर्षांपासून हे काम करीत आहेत. या कामांचे त्यांना दहा ते पंधरा हजार रुपये याप्रमाणे दरमहा वेतन मिळते. गावापासून शेकडो मैल दूर आलेली ही पोरं औरंगाबादच्या रस्त्यावरील भटके कुत्रे पकडण्याचे काम करीत आहेत. सुरुवातीला कुत्र्यांना बघूनच घाबरणारे हे तरुण आता अवघ्या काही सेकंदामध्ये कुत्र्यांना जाळ्यामध्ये पकडण्यात तरबेज झाले आहेत.