Thu, Aug 22, 2019 08:50होमपेज › Aurangabad › केव्हाही बंद होऊ शकते सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय 

केव्हाही बंद होऊ शकते सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय 

Published On: Aug 05 2018 1:39AM | Last Updated: Aug 05 2018 1:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सेंट्रल झू अथॉरिटीने दोन महिन्यांपूर्वी सोयीसुविधांचा अभाव असल्याने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता का रद्द करू नये, म्हणून नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही मनपाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे इथल्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता केव्हाही रद्द होऊ शकते, असा इशारा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे निवृत्त सचिव डॉ. बी. आर. शर्मा यांनी दिला.

महापालिकेने तयार केलेल्या शहराच्या पर्यावरण व प्राणिसंग्रहालयाच्या वार्षिक अहवालाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. शर्मा शहरात आले होते. यावेळी त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले, शहरात आल्यानंतर पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. 2) मी प्राणिसंग्रहालयास भेट दिली. तेथील अपुरी जागा, त्यातच प्राण्यांचे छोटे-छोटे पिंजरे, त्यांची झालेली दुरवस्था बघून वाईट वाटले. या प्राणिसंग्रहालयाची पुनर्निर्मिती करणे गरजेचे असल्याचे शर्मा म्हणाले. लवकरात लवकर प्राण्यांच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, सेंट्रल झू अथॉरिटीकडून मान्यता कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे  प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.

‘झू’ मनोरंजनासाठी नाही

सुटीच्या दिवशी प्राणिसंग्रहालयाला भेट देणे, मुलांना तेथील प्राणी दाखवून स्वतःचे आणि कुटुंबाचे मनोरंजन करून घेणे, यासाठी प्राणिसंग्रहालय तयार केल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तविक नष्ट होणार्‍या अथवा संख्येने कमी राहिलेल्या प्राण्यांचे जतन आणि संवर्धन हा मूळ उद्देश प्राणिसंग्रहालय निर्मिती मागे असल्याचा खुलासा डॉ. शर्मा यांनी केला. तसेच वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी प्राणिसंग्रहालय उत्तम असल्याचे सांगितले. केवळ त्या ठिकाणी विविध प्रकारचे, जातीचे प्राणी उपलब्ध असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

..तर अवघड परिस्थिती

सेंंट्रल झू अथॉरिटीने दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावली. मात्र, त्यानंतरही याचे गांभीर्य महापालिकेच्या लक्षात आलेले दिसत नाही. मनपाने अजूनही प्राणिसंग्रहालयातील पिंजर्‍यांची दुरुस्तीसह क्षुल्लक कामेही हाती घेतलेली नाहीत. त्यामुळे जर का प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द झाली, तर पुन्हा परवानगी मिळणे कठीण होईल. मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने ही औरंगाबादचीही वेगळी  ओळख आहे.