Mon, Jun 17, 2019 18:29होमपेज › Aurangabad › शिवसेनेने ताठर भूमिका सोडावी : आठवले

शिवसेनेने ताठर भूमिका सोडावी : आठवले

Published On: Jun 29 2018 1:03AM | Last Updated: Jun 29 2018 12:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सरकार अनेक चांगले निर्णय घेत असताना सत्तेत असूनही शिवसेना विरोधाचा मार्ग पत्करत ताठर भूमिका ठेवत आहे. ही भूमिका शिवसेनेेने सोडावी. स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शिवसेनेने ताठर भूमिका सोडावी असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. 

शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. सत्तेत भाजपा सोबत असूनही अनेक प्रकल्पांना त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यातल्या त्यात भाजपा शिवसेनेची दिलजमाई अमित शहा यांच्याकडून शक्य झाली नाही. आता यासाठी थेट पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती आठवले यांनी यावेळी दिली. दरम्यान, भाजप शिवसेना एकत्र लढली तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. आगामी निवडणुकीची भाजप रिपाइंला सोबत घेऊन जोरात तयारी करत असल्याचेही यावेळी सांगितले.  

रिपाइंला हवे कॅबिनेट मंत्रिपद, तीन महामंडळे

रिपाइंला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे. त्याचबरोबर रिपाइंला विधान परिषदेची एक जागा व तीन महामंडळांचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली. सध्या विविध महामंडळांवर नियुक्त्या  करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध महामंडळांवर आणि एखादे मंत्रिपद रिपाइंला मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

स्मारकासाठी प्रयत्न 

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांच स्मारक उभारण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. डॉ. पानतावणे यांच्या कन्या डॉ. निवेदिता आणि नंदिता या दोन्ही त्रैमासिक अस्मितादर्श चालविणार आहेत. त्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या वेळी भूपेश थुलकर, अ‍ॅड. गौतम भालेराव, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, नागराज गायकवाड, विजय मगरे, संजय ठोकळ, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख आदी उपस्थित होते.