Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Aurangabad › कचर्‍यावरून सेनेची कोंडी करण्याचा डाव

कचर्‍यावरून सेनेची कोंडी करण्याचा डाव

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 29 2018 1:09AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हर्सूल-सावंगी येथील नियोजित ठिकाणी दोन दिवस शांततेत कचरा टाकण्यात आला. मात्र, शनिवारी (दि. 28) अचानक भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे व त्यांच्या समर्थकांनी अचानक प्रचंड विरोध केला. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी दगडफेक करत मनपाच्या कचरा गाड्यांना पिटाळून लावले. तर बमणे पालिका अधिकार्‍यांना धमकावत त्यांच्या अंगावर धावून गेले. कचरा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सेनेला भाजपचे सहकार्य मिळत नसल्याचे बोलले जात होते. आता मात्र या घटनेवरून भाजप कचर्‍याचेही राजकारण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने सात जागांची निश्‍चिती केली आहे. त्यापैकी झाल्टा येथे दोन दिवसांत बाराशे टन कचरा टाकल्यानंतर शुक्रवारपासूून हर्सूल सावंगी येथे तलावाच्या बाजूच्या परिसरात टाकण्यास पालिकेने सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी जवळपास पन्नास गाड्यांचा कचरा तेथे टाकण्यात आला. मात्र, शनिवारी सकाळी अचानक कचरा टाकण्यास विरोध सुरू झाला. नगरसेवक बमणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास मज्जाव केला. त्यासोबत जमावाने दगडफेक सुरू केली. यात एका ट्रकच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले.

मनपा अधिकारी मांडुरके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बमणे त्यांच्या अंगावर धावून गेले. दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बमणे व त्यांच्या कार्यकर्त्यांस समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड विरोध होत असल्याचे पाहून अखेर कचर्‍याच्या सुमारे 25 गाड्या पुन्हा सेंट्रल नाका येथे रवाना करण्यात आल्याचे मांडुरके यांनी सांगितले. हर्सूल-सावंगी येथे पहिल्या दिवशी शांततेत कचरा टाकल्यानंतर शनिवारी अचानक कसा विरोध झाला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून सेनेची कोंडी करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीच आपल्या नगरसेवकास फूस लावल्याची चर्चा होती. 

...तर पाणी दूषित होईल : कचरा टाकण्यात आला त्या ठिकाणी तीन-चार विहिरी आहेत. परिसरातील हजारो नागरिकांना यातून पाणीपुरवठा होतो. कचर्‍यामुळे पावसाळ्यात येथील पाणीपुरवठा दूषित होण्याचा धोका आहे. मी न्यायालयाचा मानसन्मान राखतो, मात्र पाणी दूषित झाल्यास परवडणारे नसल्याचे बमणे म्हणाले.

बमणे यांच्यावर कारवाई? : नगरसेवक असूनही पूनमचंद बमणे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. कचर्‍याच्या गाड्यांवर बमणे यांनी स्वतः दगडफेक केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले आहे. आतापर्यंत कचरा टाकण्यास विरोध करणार्‍यांवर पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. आता तर स्वतः नगरसेवकच कचर्‍यांच्या गाड्यांवर, वाहनांवर दगडफेक करताना कॅमेर्‍यात कैद झाले आहे. त्यामुळे आता बमणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौर घोडेले देणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला. मात्र, महापौरांनी काहीच न झाल्याचा अविर्भाव आणत या प्रश्‍नास बगल दिली.