Fri, Jul 19, 2019 05:24होमपेज › Aurangabad › शिवसेनेतच पेटला ‘संभाजीनगर’ वाद

शिवसेनेतच पेटला ‘संभाजीनगर’ वाद

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:37PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करावे, या जुन्याच मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने रविवारी शहरात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी खा. चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचेच मंत्री असलेल्या पालकमंत्री रामदास कदमांवरही निशाणा साधला. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे युतीची सत्ता आहे. त्यामुळे हे नामकरण सहज शक्य आहे. मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदन दिले, पण ते नुसतेच गोड गोड बोलतात, केंद्राकडे प्रस्ताव मात्र पाठवित नाहीत, असे खैरे म्हणाले. 

हडकोतील टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर खा. खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अनेक जुन्या शिवसैनिकांची उपस्थितीही प्रकर्षाने दिसून आली. खा. खैरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी तीस वर्षांपूर्वी शहरवासीयांना संभाजीनगर असे नामकरण करण्याचा शब्द दिला होता. त्याचा पाठपुरावा मी करत आहे.

वाजपेयी पंतप्रधान असताना मी त्यांच्याकडेही मागणी केली होती. त्यावर त्यांनी राज्यात आपले सरकार नसल्याची अडचण सांगितली होती. आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे युतीचे सरकार आहे. राज्य सरकारने नामकरणाचा प्रस्ताव पाठवावा म्हणून मी मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन तीनदा भेटलो. पण ते फक्‍त गोड बोलतात, प्रस्ताव पाठवित नाहीत, असे खैरे म्हणाले. गेल्या तीस वषार्र्ंत देशातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. परंतु औरंगाबादचे संभाजीनगर होऊ शकले नाही याचा सर्वांनीच विचार करावा, असे प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले. 

महापौर नंदकुमार घोडेले, सुहास दाशरथे, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी, ऋषीकेश खैरे, संतोष माने, रावसाहेब आमले, कमलाकर जगताप, सीताराम सुरे, विजय वाघचौरे, बंडू ओक, ऋषीकेश जैस्वाल, गोपाळ कुलकर्णी, राजू खरे, अनिल पोलकर, विजय सूर्यवंशी आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

पालकमंत्र्यांवर टीका

सेनेच्या मंत्र्यांनाही सेनाप्रमुखांनी दिलेल्या या शब्दाचा विसर पडला आहे. पालकमंत्री कदम यांना मी बोललो, पण त्यांनी याचा पाठपुरावा केलेला नाही. म्हणून आता मी उद्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांनाच याबाबत मंत्र्यांना आदेश देण्याची विनंती करणार आहे. सेनेच्या आमदारांनीही या प्रश्‍नावर विधानसभेत रान उठविण्याची गरज आहे, असेही खैरे म्हणाले.