Wed, Nov 14, 2018 04:20होमपेज › Aurangabad › इंधन दरवाढ : बोर्ड छापेपर्यंत भाव बदलले!

इंधन दरवाढ : बोर्ड छापेपर्यंत भाव बदलले!

Published On: Sep 08 2018 2:29PM | Last Updated: Sep 08 2018 2:29PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. शहरात पेट्रोल 89 रुपये आणि डिझेल 78 रुपये लिटर दराने मिळत आहे. तर गॅसचे भावही 831 रुपये प्रति सिलेंडरवर पोहचले आहेत. या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने शनिवारी शहरातील विविध पेट्रोल पंपावर जनजागृती अभियान राबविण्यात आले. ही दरवाढ कशी कशी होत गेली याची माहिती देतानाच हेच का अच्छे दिन असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

पंधरा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. याविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्यातच केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेनाही या मुद्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्यावतीने शनिवारी औरंगाबादेत या दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. 

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बाबा पेट्रोल पंप आणि क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर ग्राहकांशी संवाद साधून जनजागृती केली. या ठिकाणी हेच का अच्छे दिन असे फलक लावून रोजच कशी दरवाढ होत आहे याची माहिती देण्यात आली. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले, त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणीही याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी केली. 

पोस्टर छापेपर्यंत भाव बदलले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिशय वेगाने वाढ होत आहे. त्याचा प्रत्यय शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनाही आला. शनिवारच्या आंदोलनासाठी पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी रात्री पोस्टर छपाईसाठी टाकले. त्यासाठी रात्री उशिरा पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर घेऊन ती माहिती छपाईसाठी पाठविली. परंतु सकाळी पोस्टर छापून येईपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर बदलले होते. त्यात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आंदोलकांना पोस्टरवरच्या किंमतीच्या जागेवर दुरुस्ती करावी लागली.