Tue, Jul 23, 2019 02:31होमपेज › Aurangabad › शिवसेनेकडून भाजपला निधीचे गाजर

शिवसेनेकडून भाजपला निधीचे गाजर

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 12:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

काही सदस्यांना शून्य, तर काहींना तब्बल चार कोटी निधी दिल्याचा सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करत भाजपच्या आक्रमक महिला सदस्या थेट खुर्च्यांवर उभ्या राहिल्या. काही सदस्यांनी खुर्च्या डोक्यावर घेत मागणी मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर बांधकाम सभापती आणि अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी वंचित सदस्यांची प्रत्येकी पंधरा लाख रुपये देण्याच्या आश्‍वासनावर बोळवण केली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 12) सर्वसाधारण सभा पार पडली. बैठकीस सीईओ पवनीत कौर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, मीना शेळके, कुसुम लोहकरे, अतिरिक्‍त सीईओ अशोक शिरसे, सचिव मंजूषा कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभीच भाजपचे एल. जी. गायकवाड यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा मुद्दा उपस्थित केला.

सुरेश सोनवणे म्हणाले निवडून येऊन दीड वर्ष झाले पण निधी मिळाला नाही. लक्ष वेधण्यासाठी संतप्‍त सदस्या रेखा नांदूरकर थेट खुर्चीवर उभ्या राहिल्या. पुष्पा काळे यांनीही चर्चेत सहभाग नोंदवला. तुम्ही राज्यात समन्वय ठेवा, आम्ही जि.प.त ठेवतो, असे शिवसेनेचे रमेश बोरनारे म्हणाले.यावर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी या सभागृहातील प्रश्‍न येथेच सोडवा, असे मत मांडले. अखेर अध्यक्षा आणि सभापती भुमरे यांनी वंचित सदस्यांना पंधरा लाख देण्याचे आश्‍वासन दिले.

‘वैयक्‍तिक’ बांधकाम सभापती : जि.प.चा बांधकाम विभाग हा सार्वजनिक कामांसाठी आहे. मात्र, सध्या त्याचा अर्थच बदलला असून वैयक्‍तिक विभाग झाला आहे. त्याचे सभापतीही वैयक्‍तिक बांधकाम सभापती असल्याची टीका भाजपचे गटनेते शिवाजीराव पाथ्रीकर यांनी विलास भुमरे यांच्यावर केली. बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारावर पाथ्रीकरांनी नाराजी व्यक्‍त केली.

सेना, काँगे्रसकडून ‘टॉन्टिंग’ 

समान निधी वाटपासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे, सभात्याग करूनही आश्‍वासनाशिवाय पदरी काहीच पडत नसल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले होते. आपण निधी पळवलेला असून ते आक्रमक होणारच, याची पूर्ण खात्री सत्ताधार्‍यांना होती. त्यामुळे वेळ मारून देण्याची भूमिका घेतली. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पुरते जेरीस आणले. त्यांच्या मागण्यांच्या निवेदनावर खाली बसलेल्या सेना, काँग्रेसच्या सदस्यांकडून सभेत टॉन्टिंग करण्यात येत होते.