Fri, Jul 19, 2019 05:53होमपेज › Aurangabad › ‘काँग्रेससोबत यायचे असेल तर सेनेने हायकमांडशी बोलावे’

‘काँग्रेससोबत यायचे असेल तर सेनेने हायकमांडशी बोलावे’

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 1:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिवसेनेला काँग्रेससोबत यायचे असेल तर त्यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क करून त्यांच्याशी बोलावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. औरंगाबादेत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानिमित्त ते मंगळवारी शहरात आले होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. मात्र त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने ते सत्तेबाहेर पडण्याचा इशारा देत आहेत, मात्र शिवसेनेने काँग्रेससोबत यावे की नाही, यावर मी बोलणार नाही. आघाडीचा निर्णय हा दिल्लीत होतो. त्यांना काँग्रेससोबत यायचे असेल तर त्यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधावा. मात्र भाजप साम, दाम, दंड, भेद या सर्व नीती वापरून शिवसेनेला सत्तेबाहेर पडू देणार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवलेली आहे. हेच सूत्र राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरले गेले आहे. राज्यातील सेना-भाजप युतीतील संघर्ष पाहता, येत्या काळात काँग्रेस आणि शिवसेना असे नवे राजकीय समीकरण जुळून येऊ शकते, असे मत व्यक्‍त होत आहे.

मी जिल्ह्याचा नेता : दर्डा 

2014  मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजेंद्र दर्डा यांनी तब्बल तीन वर्षांनंतर सोमवारी अचानक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरप्रसंगी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. यावेळी पत्रकारांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पूर्व मतदार संघातील कार्यकर्त्यांत चैतन्य दिसत आहे, असा प्रश्‍न विचारला त्यावर दर्डा यांनी मी पूर्वच नाही तर जिल्ह्याचा नेता आहे, असे सांगत एक प्रकारे लोकसभा लढविण्याचेच संकेत दिले आहेत.

राज्यपातळीवर शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही : अशोक चव्हाण

औरंगाबाद आणि काही जिल्ह्यांत जिल्हा परिषदेत शिवसेनेसोबत आघाडी करून सत्ता मिळवली आहे. तो निर्णय स्थानिक पातळीवरील आहे. स्थानिक पातळीवर काही वेळा अशी समीकरणे जमतात. काँग्रेस पक्षाची अधिकृत भूूमिका नाही. त्या त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकार्‍यांनी चर्चा करून  जिल्हा परिषदमध्ये सत्ता ताब्यात घेतली आहे, मात्र राज्यस्तरावर शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षांनी नेमकी उलटी भूमिका घेतली आहे.