Tue, Feb 18, 2020 05:28होमपेज › Aurangabad › गंगापुरात उभारला शिवरायांचा पुतळा 

गंगापुरात उभारला शिवरायांचा पुतळा 

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:37AMगंगापूर ः प्रतिनिधी 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील चबुतर्‍यावर छत्रपतींचा पुतळा बसविण्यात यावा, यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासूून जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीविना पडून आहे. याबाबत सरकार दखल घेत नसल्याने अज्ञात शिवप्रेमींनी हा पुतळा या चबुतर्‍यावर बसविल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले, दरम्यान शिवप्रेमींसह, पालिका कर्मचारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तींवर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरात नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असून या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बनविण्यात आलेला आहे. मात्र, हा पुतळा बसविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी मिळावी म्हणून नगर पालिकेने दोन वषार्र्ंपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. हा पुतळा बसविण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करून मंजुरी मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या चबुुतर्‍यावर जिल्हाधिकार्‍यांची परवानी नसतानाही बसविला. याप्रकरणी  नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात शिवप्रेमींविरोधात कलम 188 प्रमाणे गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला करत आहेत. दरम्यान, हा पुतळा बसविल्याचे सकाळी निदर्शनास आल्यानंतर शेकडो शिवप्रेमी, नागरिक, राजकीय पदाधिकार्‍यांनी या ठिकाणी गर्दी केली. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी, शिवप्रेमींनी पुतळा परिसरात स्वच्छता करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे नगरसेवक प्रदीप पाटील, जि. प. सदस्य मधुकर वालतुरे, रामेश्वर मुंदडा, शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, नगरसेवक लक्ष्मण सिंह राजपूत, मुकुंद जोशी, अविनाश पाटील, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विश्‍वजित चव्हाण, वाल्मीक शिरसाट, दीपक साळवे, मारुती खैरे, राजेंद्र राठोड, विनोद काळे, अशोक खाजेकार, अर्जुन सिंह राजपूत, मोहसीन चाऊस, आबासाहेब शिरसाट, नईम मन्सुरी, आनंद पाटील, मेजर प्रकाश कापरे, सतीश बारे, अनिल पाटील, सागर पाटील, सुदाम मंडलिक, लक्ष्मण आळंजकर, योगेश शेळके, सागर दळवी, सुनील धाडगे, सय्यद नवाज, नीलेश डुकरे, दिनेश राऊत, सचिन भवर, आकाश काटकर, युवराज टेमकर, पंकज शहाणे आदींसह शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती होती.