Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Aurangabad › चव्हाणांनी स्वतःची लायकी पाहावी : खैरे

चव्हाणांनी स्वतःची लायकी पाहावी : खैरे

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माझ्यावर टीका करणार्‍या आ. सतीश चव्हाणांनी आधी त्यांची लायकी तपासावी. मी त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे, एवढी त्यांची पात्रता नक्‍कीच नाही. ते स्वतः एक संस्था बळकावून बसले आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, अशा शब्दांत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी आमदार सतीश चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन खा. खैरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. खासदारकीच्या आतापर्यंतच्या काळात खैरे यांनी साधी पिठाची गिरणी तरी आणली का ? त्यांच्यापेक्षा खासदार रावसाहेब दानवे परवडले, त्यांनी ड्रायपोर्ट आणला, बरीच विकास कामे केली, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदेश दिले तर लोकसभा निवडणुकीला खैरेंच्या विरोधात आपण मैदानात उतरू, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. याबाबत दै. पुढारीने आज खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण चव्हाण यांना भाव देत नसल्याचे सांगितले. खैरे म्हणाले, चव्हाण यांनी माझ्यावर आरोप करण्याआधी स्वतःची पात्रता तपासावी. त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच मला सर्टिफिकेट दिलेले आहे. हे त्यांना बहुधा माहीत नाही. ते स्वतःच एक संस्था बळकावून बसले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्‍तीच्या टीकेला मी उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी जरूर उतरावे. मला फरक पडत नाही. माझ्याविरोधात निवडणूक लढविल्यास पराभव होणार याची त्यांनाही कल्पना आहे, परंतु ते माझ्याविरोधात निवडणूक लढविण्याचे मोठेपण मिळवू इच्छित आहेत. निवडणुकीत पडल्यावर पक्षाकडून कुठे तरी पुनर्वसन होईल असे त्यांना वाटत असावे, असा टोलाही खैरे यांनी लगावला.