Tue, May 21, 2019 12:19होमपेज › Aurangabad › घरमालकालाच तिने बनवले बनावट पती

घरमालकालाच तिने बनवले बनावट पती

Published On: Jan 19 2018 1:48AM | Last Updated: Jan 19 2018 12:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घरात किरायाने राहण्यासाठी आलेल्या एका महिलेने चक्‍क घरमालकच पती असल्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार 17 जानेवारी रोजी समोर आला. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून तिने ही कागदपत्रे कोठून बनविली याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविता (नाव बदललेले आहे) ही 2011 ते 12 यादरम्यान गजानन नगरातील अजय चैनसिंग राजपूत यांच्या घरात किरायाने राहण्यासाठी आली होती. काही कालावधीनंतर किरण यांनी सविताला खोली करण्याचे सांगितले. परंतु, तिच्या डोक्यात वेगळीच ‘शाळा’ सुरू होती. तिने खोली तर रिकामी केली, परंतु नंतर राजपूत यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्यांच्या संपत्तीवरच तिने डोळा ठेवला. दरम्यान, कोणाला तरी हाताशी धरून तिने अजय राजपूत पती असल्याची वेगवेगळी बनावट कागदपत्रे तयार केली. यात आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांचा समावेश आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक विनायक कापसे करीत आहेत. त्यांनी ही कागदपत्रे तयार करून देणारा कोण? याचा शोध सुरू केला असून फिर्यादी अजय राजपूत यांनी या कागदपत्रांच्या झेरॉक्स उपलब्ध करून दिल्या आहेत.  


एकमेकांवर गुन्हा नोंदविणे सुरूच
अजय राजपूत आणि या प्रकरणातील आरोपी महिला यांचे एकमेकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सत्र जून 2017 पासून सुरूच आहे. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर दोघांच्या फोटोचा डीपी ठेवून अजय राजपूत याने विनयभंग केला. तसेच, घरात कोंडून ठेवले, अशी फिर्याद याच महिलेने दिली होती. पुंडलिकनगर ठाण्यातच हा गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, नोव्हेंबर 2017 मध्ये अजय राजपूत याने उस्मानपुरा ठाण्यात अशोक पाटील, सदर महिला आणि अन्य दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदविला होता. यापूर्वीचा गुन्हा मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी त्यांनी केली आणि पैसे दिले नाही म्हणून मारहाण केली, असे त्यात म्हटले होते.