Fri, Apr 19, 2019 12:01होमपेज › Aurangabad › बीड बायपासला सर्व्हिस रोड हवाच

बीड बायपासला सर्व्हिस रोड हवाच

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 04 2018 12:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जीवघेण्या अपघातांची मालिकाच सुरू असल्याने बीड बायपासला ‘मृत्यूमार्ग’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पंधरा दिवसांत या रस्त्यावर चार बळी गेले असून अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी महापालिकेने सर्व्हिस रोड करावा, अशी मागणी त्या भागातील महिलांनी केली. मंगळवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी चिंता व्यक्‍त केली. तसेच, देवडानगरच्या रहिवाशांनी नारेबाजी करीत चक्‍का जाम आंदोलनाचा इशाराही दिला.  

बीड बायपास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पटेल लॉन्ससमोर पुन्हा एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शुभदा सुधीर कुपटेकर (48, रा. रो-हाऊस क्र. 16 बी, देवडानगर, बायपास) यांचा मृत्यू झाला. त्या भाडेकरू महिलेसोबत भाजीपाला खरेदीसाठी शहरात येताना हा अपघात झाला. पंधरा दिवसांत बायपासवर गेलेला हा चौथा बळी आहे. अपघाताचे हे वाढते प्रमाण पाहता प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत देवडानगर, तारक कॉलनी, माहू कॉलनी व अबरार कॉलनी भागातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठक घेतली. यात त्यांनी बीड बायपासला समांतर सर्व्हिस रोड लवकरात लवकर करावा, अशी मुख्य मागणी केली. प्र्रशासन गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण हटवण्यासाठी केवळ मार्किंग करून जात आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. 

तसेच मनपा प्रशासनाकडून मिळणारी एकही प्राथमिक सुविधा आमच्यापर्यंत पोहचत नाही. तरी, मनपाचा कर सर्व रहिवासी भरतात. किमान आम्हाला सुरक्षा तरी द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. या बैठकीस सुमारे दीडशे रहिवासींयासह वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार यांची उपस्थिती होती. त्यानंतर नागरिकांनी बीड बायपास रस्त्यावर आंदोलन केले. आंदोलनानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच रस्त्याची पाहणी केली.