Wed, Jun 26, 2019 18:20होमपेज › Aurangabad › विवाह नोंदणीत ‘सर्व्हर डाऊन’चे विघ्न!

विवाह नोंदणीत ‘सर्व्हर डाऊन’चे विघ्न!

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 12:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

 मियाँ-बीबी राजी, रिश्तेदार राजी... तो हो गयी शादी... असा विचार करून नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी जाणार असाल तर थोडे थांबा.., आता या सर्वांसोबत सर्व्हर व संगणकप्रणालीही राजी असायला हवी. नाही तर तुमच्या लग्नाचा मुहूर्त हुकला म्हणूनच समजा. शुक्रवारी विवाह बंधनात अडकण्यासाठी आलेल्या दोन जोडप्यांचे लग्न करण्याचे नियोजन या सर्व्हर डाऊनमुळे फिसकटले. 

नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी शुक्रवारी नवरदेव-नवरी नटून-सजून रजिस्ट्री कार्यालयात येऊन बसले, सोबत पालकांसह 20-25 नातेवाइकांचीही उपस्थिती होती. मात्र सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्याने त्यांच्या विवाहाचा आजचा मुहूर्त हुकला. त्यामुळे  नवरदेव-नवरीसह वर्‍हाडी मंडळींना निराश होऊन माघारी परतावे लागले. गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणार्‍या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा फटका आता नवजोडप्यांनाही बसला आहे. 

पिसादेवी परिसरातील विनोद रमेश अस्तुरे व जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शीतल सीताराम तेली (गुरुभैये) यांनी रजिस्ट्री कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी अर्ज केला होता. एकाच समाजातील असल्याने दोघांच्याही घरांतून या लग्नाला संमती होती. लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळींना घेतला होता. शुक्रवारी ते नवरदेव-नवरीला घेऊन नोंदणी विवाह करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयात पोहोचले. 

मात्र सर्व्हर डाऊन असल्याचे त्यांना सांगण्यात आले. थोडा वेळ वाट पाहू.., असे म्हणता म्हणता सायंकाळ झाली, मात्र सर्व्हरचा प्रॉब्लेम काही दूर झाला नाही. अखेर सायंकाळी त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.