होमपेज › Aurangabad › चौदाशे गावांची ‘जलयुक्‍त’मध्ये निवड

चौदाशे गावांची ‘जलयुक्‍त’मध्ये निवड

Published On: Apr 14 2018 2:01AM | Last Updated: Apr 14 2018 1:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

2019 पर्यंत दुष्काळमुक्‍तीचे शासनाचे नियोजन फिसकटले आहे. 2019 पर्यंत मराठवाडाही दुष्काळमुक्‍त होणार नसल्याचे चित्र आहे. दुष्काळमुक्‍तीसाठी हाती घेतलेल्या जलयुक्‍त अभियानात गेल्या तीन वर्षांत मराठवाड्यातील 4,448 गावांची निवड झाली आहे. तर अद्यापही साडेतीन हजार गावे या अभियानाबाहेर आहेत. निवडलेल्या गावांमध्ये कामे करूनही आज यातील अनेक गावांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. 2018-19 साठी मराठवाड्यातील 1,400 गावे निवडली आहेत. 

मराठवाड्यातील 1400 गावांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 255 गावांचा समावेश आहे, तसेच जालन्यातील 243, बीड 235, लातूर 150, उस्मानाबाद 81, नांदेड 227, परभणी 107 आणि हिंगोली जिल्ह्यातील 102 गावांचा समावेश आहे.

युती शासनाने डिसेंबर 2014 मध्ये सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्‍त महाराष्ट्र 2019 या उपक्रमांतर्गत जलयुक्‍त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात गावांची निवड करून, या गावांमध्ये सिमेंट बंधारा, नालाबांध, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण-रुंदीकरण, गाळ काढणे आदी सिंचनाची विविध कामे करण्याचे नियोजन करण्यात आले.  दरवर्षी जानेवारी महिन्यात नवीन गावे निवडायची आणि डिसेंबरपर्यंत या गावांमध्ये मंजूर केलेली कामे पूर्ण करायची, असे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र दरवर्षी हे नियोजन रखडत गेल्याने, निवडलेल्या गावांमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण करण्यात अपयश आलेले आहे. तर मागील दोन वर्षांत जलयुक्‍त शिवार अभियानात निवडलेल्या गावांची संख्याही कमी आहे. त्यामुळे 2019 पर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्‍त करण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची चिन्हे आहेत.

 

Tags : aurangabad, aurangabad news, Jalyukt Shivar Abhiyaan,