वैजापूर : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयाच्या उपकोषागार कार्यालयात मुद्रांकांसह नोटरी व रशीद तिकिटांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांनी चढ्या दराने मुद्रांक विक्री करून सामान्यांचे आर्थिक शोषण सुरू केले आहे. दरम्यान दुसरीकडे मुद्रांकांसह तिकिटांचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा उपकोषागार कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
शेतीसह विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक मुद्रांकांची मागणी करीत आहे. मात्र, तुटवडा असल्याचे कारण सांगून काही मुद्रांक विक्रेते जास्त दराने त्याची विक्री करीत जात असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. विशेषतः 500 रुपये व 100 रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. याशिवाय नोटरी व रशीद तिकिटांचाही तुटवडा भासत आहे.
500 रुपयांच्या मुद्रांकांसह नोटरी तिकीट मागील एक महिन्यांपासून शहरात उपलब्ध होत नाही. या तुटवड्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला असून मुद्रांकांसाठी नागरिकांना लगतच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यातही असाच मुद्रांक तुटवडा निर्माण झाला होता. मुद्रांक विक्रेत्यांनी परवाने नूतनीकरण न केल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले होते, परंतु आता मुद्रांक उपलब्ध असल्याचा दावा उपकोषागार कार्यालयाकडून केला जात आहे तर दुसरीकडे मुद्रांक उपलब्ध नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.