Mon, Nov 19, 2018 11:30होमपेज › Aurangabad › विशिष्ट दुकानांतूनच खरेदीची सक्‍ती नको

विशिष्ट दुकानांतूनच खरेदीची सक्‍ती नको

Published On: Apr 06 2018 2:19AM | Last Updated: Apr 06 2018 1:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. तसेच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्‍ती पालकांना करू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत.

शहरातील इंग्रजी शाळांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवेश सुरू असल्याच्या जाहिराती लावल्या आहेत. पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शाळांकडून होत आहे. यातूनच पालकांची लूट शाळा करतात. मात्र, नियमांनुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया राबवायची असते. याला बगल देत शाळांनी यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून जास्तीचे शुल्क वसूल करत आहे.

काही पालकांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संकेत शेटे यांच्या नेतृत्वात संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेश देण्यात येऊ नये, जास्तीचे शुल्क आकारू नये, तसेच मोफत व सक्‍तीचे शिक्षण अधिनियम 2009 नुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठराविक दुकानातूनच शालेय साहित्य, गणेवश, बूट खरेदीचीही सक्‍ती करू नये, असेही शिक्षणाधिकार्‍यांनी शाळांना कळविले आहे.