Sun, Jul 21, 2019 16:57
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › सावंतवाडी स्लीपर कोच बस महिनाभरातच बंद

सावंतवाडी स्लीपर कोच बस महिनाभरातच बंद

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आलेली औरंगाबाद ते सावंतवाडी स्लीपर कोच बस सेवा प्रवाशांच्या अपुर्‍या संख्येमुळे बंद करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली आहे. आता हीच बस मुंबई मार्गावर सोडण्यात आली आहे. म्हणावी तशी प्रसिद्धी न केल्यामुळे या बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही.

औरंगाबाद एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात पहिल्यादांच वातानुकूलित दोन स्लीपर कोच बसेस 9 एप्रिल रोजी दाखल झाल्या होत्या. या दोन्ही बसेस मध्यवर्ती बसस्थानकातून सावंतवाडीला सोडण्यात आल्या होत्या, परंतु या मार्गावर प्रवासी संख्येअभावी आता त्या बंद करून मुंबई मार्गावर सोडल्या जात आहेत. खासगी ट्रॅव्हल्स बसच्या तोडीस तोड सेवा देण्यासाठी एस.टी.महामंडळाने शिवशाही, हिरकणी यासारख्या आरामदायी व विविध सुविधा असलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरविल्या. त्या पाठोपाठ स्लीपर कोच बससुध्दा प्रवाशांच्या सेवेसाठी सावंतवाडीपर्यंत सोडली होती. मात्र सावंतवाडी या मार्गावर स्लीपर कोच बसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ती बंद करून आता पुणे मार्गे मुंबईला सोडण्यात येत आहे. 

सिडको बसस्थानकातून दररोज रात्री साडेदहा वाजता ही स्लीपर कोच बस पुणे मार्गे मुंबईला रवाना होते. मुंबईला जाणार्‍या प्रवाशांसाठी 901 रुपये तिकीट दर आहे तर पुणेसाठी 537 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही स्लीपर कोच बससेवा सुरू करण्यात आली आहे.