Mon, Apr 22, 2019 02:23होमपेज › Aurangabad › ‘सावरकर’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना अटक

‘सावरकर’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना अटक

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डीडी घेण्यासाठी तीन व्यापार्‍यांनी दिलेले 83 लाख 15 हजार 50 रुपये परस्पर हडप करून फसवणूक केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. 15) अहमदनगर येथे ही कारवाई केली. 

अध्यक्ष प्रमोद बालाजी निमसे (32, रा. केडगाव, अहमदनगर) आणि उपाध्यक्ष गणेश शंकर थोरात (32)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपी सोसायटीचा सरव्यवस्थापक चंद्रकांत बतकुलवार याला यापूर्वीच अटक केली होती. त्याला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

याबाबत पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, जळगाव येथील कपड्याचे होलसेल व्यापारी जयपालदास गिरिधारीलाल साहित्या (रा. गायत्रीनगर, म्हसरूम तलाव, जळगाव) हे फिर्यादी आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी 60 लाख रुपये वसूल केले, परंतु त्यांनाही दुकानाच्या व्यापार्‍यांना पैसे द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी औरंगाबादेत डीडी काढून पैसे द्यायचे ठरविले. त्यानंतर सावरकर सोसायटीचा शाखा व्यवस्थापक रवींद्र जेसू जाधव व महाव्यवस्थापक चंद्रकांत बतकुलवार यांची भेट घेऊन त्यांनी डीडीची प्रक्रिया पूर्ण केली. आरोपी रवींद्र जाधव याने संध्याकाळी डीडी मिळतील, असे सांगितले.

परंतु, त्यानंतर जयपालदास यांना डीडी काही मिळाले नाहीत. विशेष म्हणजे, दहा दिवसांनी जाधव याने डीडी म्हणून अ‍ॅक्सिस बँकेचे अकाउंट पे धनादेश दिले. तेही वटले नाहीत. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता. जयपालदास यांच्यासह कैलास मनोहरलाल दलवाणी यांना 25 लाख 37 हजार 250 आणि रोशन मूलचंद जयस्वानी यांना 4 लाख 37 हजार 800 रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, हवालदार सुनील फेपाळे करीत आहेत.