Mon, Jun 17, 2019 00:45होमपेज › Aurangabad › सातारा-देवळाईत ९० कोटींचे एलईडी

सातारा-देवळाईत ९० कोटींचे एलईडी

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 12:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी प्रकल्पातून 90 कोटी रुपये खर्चून सातारा देवळाईसह शहरालगतच्या काही भागांत एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येणार आहे. पुरेसा निधी उपलब्ध असल्याने प्रस्तावाला मंजुरी मिळताच काही महिन्यांतच या कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.

महानगरपालिकेने शहरातील पथदिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचे 114 कोटी रुपयांचे कंत्राट याआधीच खाजगी एजन्सीला दिलेले आहे. संबंधित एजन्सीने नुकतेच या कामाला सुरुवात केली आहे.
 हे कंत्राट पाच वर्षांपूर्वी दिले होते. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने या एजन्सीला कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवात करायला लावली आहे. हे कंत्राट दिले त्यावेळी सातारा देवळाई हा भाग मनपा हद्दीत नव्हता. त्यामुळे या कंत्राटात त्या भागात एलईडी दिवे लावले जाणार नाहीत. आता स्मार्ट सिटीत एलईडी दिव्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. 

शहरातील एलईडी दिव्यांचे कंत्राट आधी दिलेले असल्याने आता या निधीतून सातारा देवळाई आणि आधीच्या कंत्राटात नसलेल्या शहरातील उर्वरित भागात एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत.

मनपा आयुक्त दीपक मुगळीकर म्हणाले की, स्मार्ट सिटीत एलईडी दिव्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. यातून मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा देवळाई आणि शहरातील जो भाग आधीच्या कंत्राटात नाही तिथे एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. त्याला स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येईल.