Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Aurangabad › सालारजंगची मालमत्ता परस्पर विकली

सालारजंगची मालमत्ता परस्पर विकली

Published On: Jun 01 2018 1:56AM | Last Updated: Jun 01 2018 12:28AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नवाब सालारजंग (3) मीर युसूफअली खान यांची मालमत्ता वारसाहक्‍काने त्यांच्याकडे कामाला असलेल्या 107 लोकांकडे आली आहे. यापैकी औरंगाबादेतील वेगवेगळ्या 12 भूखंडांची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर विक्री केल्याचे समोर आले. यात तब्बल 2 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यात 31 मे रोजी एकाला अटक करण्यात आली. 

मोहंमद नसिरोद्दीन मोहंमद उस्मानोद्दीन असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मीर महेमूद अली खान बशारत अली खान (67, रा. वाहेदनगर, जुना मालकपेठ, हैदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मीर महेमूद अली खान यांचे वडील बशारत अली खान हे नवाब सालारजंग (3) मीर युसूफ अली खान यांच्याकडे कामाला होते. नवाब अविवाहित होते. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील त्यांच्या वेगवेगळ्या मालमत्ता वारसाहक्‍काने त्यांच्याकडे कामाला असलेल्या लोकांना मिळाल्या. उच्च न्यायालय (हैदराबाद) येथे 27 नोव्हेंबर 1958 आणि 2 डिसेंबर 1958 रोजी नवाब सालारजंग यांच्या मिळकतीच्या अनुषंगाने तडजोड डिक्री दाखल केलेली होती.

या दाव्यात 107 लोक आहेत. त्यानुसार, सालारजंग यांची शिल्लक असलेली मालमत्ता वारसाप्रमाणे मीर महेमूद अली खान यांची आहे. या मालमत्तेपैकी शहरातील वेगवेगळे 12 भूखंड आरोपी मोहंमद नसिरोद्दीन याने बनावट स्वाक्षर्‍या करून आणि बोगस कागदपत्रे काढून परस्पर विक्री केले. तसेच विविध लोकांना विकसन हक्‍क लिहून देऊन तब्बल 2 कोटींचा आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून पोलिसांनी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर लगेचच आरोपी नसिरोद्दीन याला अटक केली. 

बनावट कागदपत्रे तयार करणारे रडारवर

आरोपी मोहंमद नसिरोद्दीन मोहंमद उस्मानोद्दीन याच्यासोबत बनावट कागदपत्रे तयार करणारी मोठी टोळी या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू करण्यात आला असून आणखी किती मालमत्ता अशा पद्धतीने परस्पर विक्री केल्या, याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.

शिक्के, हार्डडिस्क, कागदपत्रे जप्त

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, सहायक फौजदार सुभाष खंडागळे, हवालदार गोकूळ वाघ, प्रकाश काळे, दत्तू गायकवाड, पोलिस नाईक सुनील फेपाळे, कारभारी गाडेकर, मनोज उईके, कॉन्स्टेबल सचिन संपाळ, महेश उगले, दादासाहेब झारगड, जयश्री फुके यांच्या वेगवेगळ्या पथकांनी आरोपी नसिरोद्दीन यांच्या घरी आणि कार्यालयात गुरुवारी सकाळी छापा मारला. तेथून संगणकाची हार्डडिस्क, लॅपटॉप, वेगवेगळे 32 शिक्के, जमिनीची बनावट कागदपत्रे जप्त केली.