होमपेज › Aurangabad › लंकेश यांची हत्या करणार्‍या आरोपींनी दिले सचिनला पिस्तूल

लंकेश यांची हत्या करणार्‍या आरोपींनी दिले सचिनला पिस्तूल

Published On: Aug 31 2018 1:36AM | Last Updated: Aug 30 2018 1:47AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या सचिन अंदुरेला पिस्तूल दिल्याचे तपास यंत्रणेतील सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे लंकेश हत्या प्रकरणातील तीन आणि दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन अशा पाच आरोपींना समोरासमोर आणून चौकशी करण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना अटक केलेली आहे. तर, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून अटक केली आहे. गोळ्या झाडणारा दुसरा आरोपी शरद कळसकर असल्याचे सांगितले जाते. तो नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसच्या कोठडीत आहे. 

दरम्यान, अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केली. त्यामुळे लंकेश आणि दाभोलकर हत्या प्रकरणाचे कनेक्शन उघड होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, त्याच आरोपींनी 7.65 एमएमचे भारतीय बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. ते सीबीआय आणि एटीएसने रोहित रेगेच्या घरातून जप्त केले असून, या प्रकरणात सचिनचा मेहुणा शुभम सुरळे व अजिंक्य सुरळे यांना अटक केलेली आहे, अशी महत्त्वाची लिंक तपास यंत्रणांना लागली आहे. त्यामुळे या पाचही आरोपींना समोरासमोर आणून त्यांची चौकशी करण्याची तयारी सीबीआयने केली आहे.  

वडिलांनी घेतली शरदची भेट

नालासोपारा बॉम्बसाठा प्रकरणात एटीएसने अटक केलेला शरद कळसकर हा दौलताबादजवळील केसापुरीचा रहिवाशी आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा आरोपी तोच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यामुळे भेट घेण्यासाठी त्याचे वडील मुंबईला गेले होते. ते त्याला भेटले असून, माझा या प्रकरणात काहीच संबंध नाही, असे त्याने वडिलांना सांगितले आहे, अशी माहिती केसापुरी येथील नातेवाईकांनी दिली.