Tue, Mar 26, 2019 08:29होमपेज › Aurangabad › प्रवासी वाढवण्यासाठी एसटी महामंडळाची पालकत्व योजना

प्रवासी वाढवण्यासाठी एसटी महामंडळाची पालकत्व योजना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


औरंगाबाद : जे. ई. देशकर 

खासगी ट्रॅव्हल्समुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महामंडळ विविध योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून आता बसचे पालकत्व अधिकार्‍यांकडे देऊन प्रवासी वाढ व उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून सुरू आहे. ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली असून या योजनेत सुमारे 39 बसचे पालकत्व अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आले आहे. 

लांब पल्ल्याच्या बसमध्ये प्रवासी संख्या कमी असते. या गाड्यातील प्रवासी संख्या वाढवून उत्पन्नात वाढ करता येऊ शकते, यावर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर प्रवासी वाढवणे व त्यासाठी वाहक-चालकांनी काय केले पाहिजे याची माहिती देण्यापासून ते प्रवाशांना येणार्‍या अडचणी व त्याचे निरसन करण्याची जबाबदारी आगार प्रमुखासह येथील बसस्थानक प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येकाकडे लांब पल्ल्यावर जाणार्‍या बसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही बस प्लॅटफॉर्मवर लागण्यापासून ते ती बसस्थानकाबाहेर पडेपर्यंत संबंधित अधिकार्‍यांनी पूर्ण काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्या बसवरील वाहक व चालकांचे प्रबोधन करण्याचेही काम या अधिकार्‍यांनी करायचे आहे. 

या योजनेत आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख, तिकीट तपासणीस, कंट्रोलर, सुपरवायझर सह इतर अधिकार्‍यांना बसचे पालकत्व दिले आहे. या योजनेचा चार ते पाचच दिवसांत सकारात्मक परिणाम दिसून  येत असून यामुळे प्रवाशांत वाढही होत असून चालक वाहकांच्या वर्तनात बदल दिसून येत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.