होमपेज › Aurangabad › एस. टी. च्या वाढीव दरांमुळे रेल्वेच ठरतेय सामान्यांची सवारी

एस. टी. च्या वाढीव दरांमुळे रेल्वेच ठरतेय सामान्यांची सवारी

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:52AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

दळणवळणासाठी सर्वसामान्य प्रवाशांना एस. टी. चा एकमेव आधार आहे. एस. टी. ची ओळखच सर्वसामान्यांची सवारी म्हणून झाली होती, परंतु एस. टी. तील आधुनिकपणा व वाढते दर यामुळे भाड्यात जबर वाढ झाली आहे, असे असले तरी रेल्वे मात्र त्याच दरांत प्रवासी सेवा देत आहे. त्यामुळे सामान्यांची सवारी एस. टी.  नाही तर रेल्वेच ठरत आहे. 

साध्या पॅसेंजर रेल्वेचे प्रतिकिलोमीटर प्रवासासाठीचे दर सवार्र्ंत कमी म्हणजे 29 ते 59 पैसे, असे नगण्य आहेत. एक्स्प्रेस रेल्वेतील स्लिपर कोच आणि वातानुकूलित कोचचे दर मात्र 15 ते 20 रुपये प्रतिकिलोमीटरपर्यंत जातात. असे असले तरी नुकतेच एस. टी. ने भाडेवाढ केली आहे यामुळे साध्या एस. टी. ला प्रतिकिलोमीटर एक रुपये 5 पैसे मोजावे लागत होते. त्या ठिकाणी एक रुपया 48 पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सवार्र्ंत स्वस्त प्रवास रेल्वेचा ठरला आहे. खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांची सवारी रेल्वेच म्हणावी लागेल.  एस. टी. ची दरवाढ होण्यापूर्वीही बसपेक्षा रेल्वेच परवडणारी होती, असे असले तरी आता नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे पुन्हा रेल्वे व एस. टी.  बसच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात तफावत वाढली आहे. त्यामुळे ज्या-ज्या मार्गावर रेल्वेची सुविधा आहे, त्या मार्गावरील एस. टी. ने प्रवास करणारा प्रवासी हळूहळू रेल्वेकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.