Thu, Jul 18, 2019 17:12होमपेज › Aurangabad › कामं होत नसतील तर निधी देऊन काय फायदा?

कामं होत नसतील तर निधी देऊन काय फायदा?

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी महानगरपालिकेला दहा महिन्यांपूर्वी शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला, परंतु या निधीतील रस्त्यांच्या कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मनपाच्या पदाधिकार्‍यांसमोर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. एका महापौराचा कार्यकाळ संपला, आता सभापतींचा संपतो आहे, तरीही कामे होत नसतील तर निधी देऊन काय फायदा, असेही मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकार्‍यांना सुनावले. 

मुख्यमंत्री  शनिवारी ऑरिक सिटीच्या उद्घाटन समारंभानिमित्त औरंगाबादेत आले होते. मनपातील पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सकाळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन, तसेच आमदार अतुल सावे, माजी महापौर भगवान घडामोडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींच्या रस्त्यांबाबत विचारणा केली. दहा महिन्यांपूर्वी 100 कोटींचा विशेष निधी मंजूर केला, पण अजून त्या कामांना सुरुवातही झालेली नाही.

घडामोडे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपला. आता सभापती बारवालांचा कार्यकाळ संपतो आहे. तरीही कामे होत नाहीत. मग निधी देऊन काय फायदा असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर महापौरांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु प्रकरण न्यायालयात गेले आहे, म्हणून उशीर होत असल्याचा खुलासा केला, मात्र या खुलाशानंतरही मुख्यमंत्र्यांची नाराजी कमी झाली नाही. त्यांनी मनपाचा कारभार गतिमान करण्याची सूचना दिली. 

Tags : Aurangabad, Roads issue Chief Minister expressed strong disappointment