Thu, Jun 20, 2019 21:00होमपेज › Aurangabad › रस्ता, कचरा, पाण्यासाठी उद्रेक

रस्ता, कचरा, पाण्यासाठी उद्रेक

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महापालिकेच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढण्यास सुरुवात झाली आहे. रस्ता, कचरा व पाणी प्रश्‍नासाठी रविवारी विविध घटनांत नागरिकांनी रौद्ररूप धारण केले. कचरा उचलण्यासाठी औरंगपुरा भाजीमंडईसमोर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी विश्रांतीनगरच्या नागरिकांनी नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरावर धडक दिली, तर दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या सिडको, तेरावी योजनेतील नागरिकांनी नगरसेविका मनीषा मुंढे यांच्या घरावर मोर्चा काढला.

साडेचार महिने उलटूनही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यात महानगरपालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आता हळूहळू नागरिकांमधील रोष वाढायला सुरुवात झाली आहे. रविवारी औरंगपुरा भाजीमंडईजवळ काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्‍त केला. भाजीमंडईजवळ मनपाने साठविलेल्या कचर्‍याची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हा कचरा तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी करीत नागरिकांनी काही वेळासाठी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला.

शहरात 16 फेब्रवारीपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. नारेगावचा कचरा डेपो बंद झाल्यापासून मनपाकडून जागा मिळेल तिथे आणि शहरातही जागोजागी कचरा साठविण्यात येत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हा कचरा सडायला लागला असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. औरंगपुरा भागातील भाजीमंडईलगत नाल्याशेजारीही मनपाने काही दिवसांपासून कचरा साठविलेला आहे. तिथेही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने रविवारी या भागातील नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. सुराणा कॉम्प्लेक्स भागातील काही नागरिक आणि व्यापार्‍यांनी रस्त्यावर उतरू न मनपाचा निषेध केला. मनपाने हा कचरा तत्काळ उचलावा तसेच यापुढे इथे कचरा टाकू नये, अशी मागणी केली. सुमारे पंधरा मिनिटे वाहतूक अडवून धरत या नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्‍त केला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात राकेश जैन, मनोज अग्रवाल, गिरधारी अग्रवाल, जलील खान, पप्पू व्यास, प्रदीप संचेती, कुसुम जैन, भाविका जैन, चेतन जैन, दिया जैन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

नगरसेवक राठोड यांच्या घरावर नागरिक धडकले

रस्त्याच्या कामासाठी विश्रांतीनगर वॉर्डातील नागरिकांनी शनिवारी रात्री नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरावर धडक दिली. रस्त्याअभावी पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी या नागरिकांनी केली. नगरसेवकाकडून काम करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे नागरिक आपापल्या घरी परतले.

जयभवानी नगरातील आठ गल्ल्यांचा समावेश विश्रांतीनगर वॉर्डात होतो. यातील गल्ली नंबर 14 मधील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथील सुमारे शंभर ते दीडशे नागरिक शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या घरी पोहचले. त्यांनी या रस्त्याची व्यथा मांडली. गल्ली नंबर 14 मधील रस्ता अत्यंत खराब झाला असून, चिखलामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. शनिवारी या ठिकाणी एक महिला पडून जखमी झाली. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम करण्याची मागणी या नागरिकांनी केली.

मुंढेंच्या घरावरही मोर्चा

सिडकोच्या तेराव्या योजनेत नळाला दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांनी शनिवारी रात्री जयभवानी नगर वॉर्डाच्या नगरसेविका मनीषा मुंढे यांच्या घरी धाव घेतली. महानगरपालिकेने या ठिकाणी नवीन ड्रेनेजलाईन टाकली आहे. मात्र अद्याप त्यावर नागरिकांचे कनेक्शन जोडलेले नाहीत. दुसरीकडे ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडले जात असल्याने काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत आहे. शनिवारी या भागात पाण्याचा दिवस होता. त्यावेळीही पाणी दूषित आल्याने काही महिलांनी मनीषा मुंडे यांच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यांनी नव्या ड्रेनेजलाईनला कनेक्शन जोडून घेण्याचे आवाहन केले.