Fri, Aug 23, 2019 23:25होमपेज › Aurangabad › दंग्याचे धक्‍कादायक व्हिडिओ व्हायरल

दंग्याचे धक्‍कादायक व्हिडिओ व्हायरल

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादेत पेटलेल्या दंगलीला पाच दिवस उलटले आहेत. आता या दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून दंगेखोरांकडून दगडांचा वर्षाव सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात पोलिस बचावात्मक पवित्र्यात दिसत असून संरक्षणासाठी त्यांनी फर्निचरचा आडोसा घेतला. तसेच, सोबतच्या तरुणांनी पत्रे आडवे लावून दगडांचा वर्षाव रोखल्याचे दिसत आहे. 

11 मे रोजी रात्री गांधीनगर-मोतीकारंजा भागात दोन समाजांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. ही माहिती जुन्या औरंगाबादेत पसरल्यानंतर राजाबाजार, शहागंज, जिन्सी, नवाबपुरा चौकात दोन समाजामध्ये प्रचंड तणाव निर्माण होऊन तुफान दगडफेक झाली. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर राजाबाजार भागाकडून तरुणांच्या मदतीने पोलिस पुढे सरकले. मात्र, जिन्सी भागाकडून पोलिस समोर आलेच नाहीत. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीवरून राजाबाजारच्या दिशेने दगडांचा वर्षाव सुरू होता. रस्त्यावर प्रचंड जमाव व पोलिस होते. त्या परिस्थितीतही इमारतीवरून अनेकजण हाताने आणि गलोरने दगड मारत होते. यात शेकडो तरुण जखमी झाले. 

चौथ्या मजल्यावर हल्ल्यासाठी विटांचे ढीग

दंगल पेटल्यावर नवाबपुरा चौकातील एका चार मजली इमारतीवरून दगडांचा पाऊस सुरू होता. हा प्रकार शनिवारी लक्षात आला. मात्र, पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवायचे असल्याने त्यांनी याची दखल घेतली नाही. रविवारीही तणाव असल्याने पोलिसांनी याची नोंद घेतली नाही. मात्र, आजही त्या इमारतीवर विटांचा ढिगारा असल्याचे दिसून आले. 

रॉकेलची टाकी आणली ढकलत

नवाबपुरा चौकात जाळपोळ करण्यासाठी दंगेखोरांनी रॉकेलची 200 लिटरची टाकी ढकलत आणल्याचेही एका व्हिडिओत दिसत आहे. यावरून दंगेखोरांनी किती हैदोस घातला, हे स्पष्ट होते. रस्त्यावरून रॉकेलच्या बाटल्या, त्यामध्ये वाती असल्याचे काही व्हिडिओ यापूर्वीच व्हायरल झाले होते. यावरून दंगेखोरांचा उद्रेक दिसून येतो.