Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Aurangabad › वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करणार

वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करणार

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 12:37AM

बुकमार्क करा


करमाड : प्रतिनिधी 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस यापुढे सरकार सुशासन दिन म्हणून साजरा करणार आहे. विविध योजनांचा लाभ देऊन शेतकर्‍यांना सुखी ठेवणे आणि सामान्य जनता राज्यात कशी सुरक्षित राहिल, याबाबत गांभिर्य घेणे हे या दिनाचे मुख्य वैशिष्ठे राहणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

करमाड येथे सोमवारी (दि.25) भाजयुमोच्या वतीने सुशासन युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, माजी मंत्री नामदेव गाढेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना महसूल मंत्री पाटील म्हणाले, देशातील 14 राज्यांत शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण यापूर्वी जास्त होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या सिंचन योजना राबविल्या आहेत. त्यात ठिबक सिंचन योजना, विहीर पुनर्भरण, विहीर खोलीकरण, जलयुक्त शिवार अभियान आदींचा योजनांचा सामवेश आहे. जलयुक्त शिवार अभियानात नदी, नाले, तलावातील रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे करण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने राज्याचे उत्पादन 50 टक्के वाढले आहे. शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी मातीपरिक्षणावर सरकार भर देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.  

पुढे बोलताना पाटील म्हणाले, आमची केंद्रात सत्ता येण्यापूर्वी महिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या. पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजनेतंर्गत केंद्र सरकारने देशातील दोन कोटी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करून चुलमुक्त केले आहे. प्रत्येक गावांतील गरोदर महिला सक्षम व्हावी, तिचे मुले सुदृढ व्हावे, यासाठी राज्य सरकारने गरोदर महिलांना प्रत्येकी 6000 रुपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे भाजप हा शेतकरी व सामान्य नागरिकांना सुरक्षित तसेच सुखी ठेवणारा पक्ष असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केलेे. 

कार्यक्रमास फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाट, लक्ष्मण औटी, सजनराव मते, रघुनाथ काळे, साहेबराव डिघुळे, दामुअण्णा नवपुते, अशोक पवार, श्रीराम शेळके, गोविंद वाघ, सुदाम ठोंबरे, विकास गायकवाड, बापू घडामोडे, शिवाजी पाथ्रीकर, प्रकाश चांगुलपाये, जितेंद्र जैस्वाल, जि. प. सदस्य अनुराधा चव्हाण, अप्पासाहेब शेळके, गोपीनाथ वाघ, दत्ता उकर्डे, राजू शिंदे, शिवाजी मते यांच्यासह तालुक्यातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊराव मुळे यांनी तर उपस्थितांचे आभार औरंगाबादचे उपमहापौर तथा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी मानले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आदर्श कवी व शिक्षक आहेत. ते युवकांचे प्रेरणास्त्रोत असून त्यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे, ही अत्यंत आनंदायी बाब आहे. वाजपेयी यांच्या आदर्श घेऊन भाजपचे सरकार चालत आहे. आमचे सरकार राज्यातील 41 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देत असून त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. 

सरकारने आतापर्यंत राज्यात 6 हजार कोटी रुपयांचे रस्ते तयार केले आहेत. विरोधकांना जे काम पंधरा वर्षांत जमले नाही, ती विकासाची कामे आमच्या सरकारने तीन वर्षांत करून दाखविले. कुणाला केलेल्या कामाचा हिशोब पाहिजे असेल तर मी तो देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपच्या वतीने प्रत्येक गावात एक बूथ वीस युवक ही संकल्पना तयार केली. त्या युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील हजारो कार्यकर्त्यांनी सदर मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांचा भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर विजय औताडे यांनी सत्कार केला.