Sat, Apr 20, 2019 16:01होमपेज › Aurangabad › भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनी उलगडला आपला क्रिकेट प्रवास

कैरीचा केला चेंडू, बैलगाडीच्या लाकडाची बॅट

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लहानपणी आजीसोबत डोक्यावर टोपली घेऊन शेतात जायचो, कैर्‍या तोडण्यासाठी झाडांवर केलेली दगडफेक व कैर्‍यांचा चेंडू तसेच बैलगाडीच्या लाकडाच्या बॅटने क्रिकेटचा श्रीगणेशा सुरू केला, यानंतर थेट भारतीय संघाचा खेळाडू व आता मेटॉर (फलंदाजीचा प्रशिक्षक) बनलो, अशा शब्दांत मराठवाड्याचा सुपुत्र व निवृत्त अष्टपैलू संजय बांगरने आपला प्रवास उलगडून दाखविला. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्‍वकर्मा सभागृहात बीडकर बांगरने क्रिकेटसह एक उत्कृष्ट वाचक असे त्याच्या जीवनातील अनेक पैलू उपस्थितांपुढे मांडले.

सांस्कृतिक मंडळ ते मुंबई

औरंगाबादला शिकत असताना सांस्कृतिक मंडळावर किरण जोशी हे गुरू लाभले. क्रिकेटमधील माझे दैवत सुनील गावसकर यांचे कोच वसंत अलमाडी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. सनीचा हुक हा फटका मला भलताच भावला. पॅड व ग्लोव्हज्विना आम्ही सराव केला. इक्बाल सिद्दीकी, शिरीष बोराळकर, अनंत नेरळकर, सचिन मुळे, अजित मुळे, हबीब शेख, प्रभूलाल पटेल अशी आमची फलटण होती.

मी मुंबई, पश्‍चिम विभाग, रणजी ते भारतीय संघात शिरकाव केला. प्रयत्न व जिद्दीची त्यास साथ होती. क्रिकेटच्या बळावर रेल्वेखात्यात नोकरी मिळाली. अमित पागनिस, कुलमनी परिंदा, हरमितसिंग, मुरली कार्तिक हे माझे संघ सहकारी.विदर्भाविरुद्धच्या लढतीत 7 गडी बाद केल्याने निवडकर्ते शिवलाल यादव यांनी मला हेरले. 

29 व्या वर्षी भारतीय संघात

रणजी व देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर मला झिम्बाब्वे तसेच इंग्लंडविरुद्ध कसोटीत संधी मिळाली. टीनू योहाननसह  इक्बाल हाही इंग्लंडसोबतच्या कसोटीत होता. चिवट फलंदाजी करून मी योगदान दिले. मात्र कधी संधी कधी डच्चू सुरू राहिले. यानंतर वेस्ट इंडिज, इंग्लंड दौर्‍यात संधी मिळाली. वसीम जाफर, शिवसुंदर दास यांच्याशी तगडी स्पर्धा होती. दासने काउंटीत 260 व मी 74 धावा करूनही सिलेक्टर्सनी मला निवडले.

सनीच्या आत्मचरित्राचे पारायण 

लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या आत्मचरित्राचे मी पारायणच केले असून शिवाजी सावंत यांची मृत्युंजय, गीता, संभाजी व शिवाजी महाराजांवरील पुस्तके तसेच अ‍ॅलेक फर्ग्युसन हा आवडता लेखक असल्याचे तो म्हणाला.

औरंगाबादचा अंकित बावणे, जालनेकर विजय झोल यांना कसोटीत संधी केव्हा मिळणार? या प्रश्‍नावर बांगरने दोघांना आत्मपरीक्षणाचा सल्‍ला दिला. आयपीएल म्हणजे सर्व प्रकारची कटुता, द्वेषविरहित खेळ. यात एका संघात अनेक देशांचे खेळाडू एकत्र राहत असल्याने अनोखी एकता तयार होते, असे बांगर म्हणाला. तसेच त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. याप्रसंगी सीएमआयचे अध्यक्ष डॉ. सी. पी. त्रिपाठी, साईचे सहायक व्यवस्थापक वीरेंद्र भांडारकर, आशिष गर्दे, रणजित कक्‍कड, उल्हास  शिऊरकर, पारस छाजेड, चिराग गादिया, अ‍ॅड. संजय डोंगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर देशपांडे यांनी केले.